Crime News | बोगस डॉक्टरच्या उपचारानंतर 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू; 4 तासांत दिली 9 इंजेक्शन, डॉक्टर बहिणीचा शोध सुरु

Crime News | 18-year-old dies after treatment by fake doctor; 9 injections given in 4 hours, search on for doctor’s sister

जबलपूर, मध्य प्रदेश : Crime News |  जबलपूर जिल्ह्यातील कटंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेलखाडू येथील अश्वनी रुग्णालयात कथित बोगस डॉक्टरने केलेल्या उपचारानंतर १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश साहू याला अटक केली असून, त्याची बहीण डॉ. सरिता साहू हिचाही पोलीस शोध घेत आहेत.

मृत तरुणाचे नाव शेखर चौधरी (वय १८, रा. झांगरा गाव) असे असून, तो जगदीश चौधरी यांचा मुलगा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शेखरच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी बेलखाडू येथील अश्वनी रुग्णालयात दाखल केले.

या ठिकाणी उपचार करणाऱ्या सतीश साहू याने अवघ्या चार तासांत शेखरला तब्बल नऊ इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे. उपचारानंतर काही प्रमाणात आराम मिळाल्याने कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले.

मात्र, दुसऱ्याच दिवशी शेखरला पुन्हा पोटदुखी आणि जळजळीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला पुन्हा त्याच रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी सतीश साहू याने इंजेक्शन मिसळून सलाइन लावल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान शेखरची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कटंगी पोलिसांनी तपास सुरू केला असता सतीश साहू याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली वैध शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.

याप्रकरणी ब्लॉक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (BMO) रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी सतीश साहू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

You may have missed