Divya Shinde News | पुणे : ‘बिग बॉस’ मराठी फेम दिव्या शिंदे कोठडीत असताना पोलिसांना सहकार्य करत नाही, अंगविक्षेप आणि आरडाओरड करते; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात 17 जणांचा सहभाग असल्याचा दावा
पुणे : Divya Shinde News | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या सुनील शिंदे (Divya Sunil Shinde) हिच्या पोलिस कोठडीत 2 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) हा आदेश दिला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात 17 जणांचा कथित सहभाग समोर आला आहे. हल्ल्यासाठी आठ दुचाकींचा वापर झाल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
हल्ल्यात कथितपणे वापरण्यात आलेली हत्यारे, मोबाइल फोन तसेच अन्य डिजिटल पुरावे अद्याप जप्त करायचे असल्याने दिव्या शिंदेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास यंत्रणेने न्यायालयात केली.
दिव्या शिंदेला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तपासाच्या आधारे हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींविषयी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
तपास पथकाने ब्लू नाईल हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये आप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांच्या मुलामध्ये पाच लाख रुपयांच्या कथित खंडणीबाबत बैठक झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
आप्पा ढमढेरे (रा. पिंपरी), निखिल शिंदे, निखिलची होणारी पत्नी आणि ताहीर (रा. कोंढवा) यांच्यासह अन्य 13 अनोळखी व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्यारे आणि मोबाइल जप्त करणे बाकी
हल्ल्यात कथितपणे वापरण्यात आलेले लोखंडी हत्यार, लाकडी दांडके, स्वाक्षऱ्यांचे नमुने, हस्तलिखित मजकूर तसेच हल्ल्याचे चित्रीकरण करणारा मोबाइल फोन अद्याप जप्त करायचा असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.
सरकारी वकील ॲड. आम्रपाली कस्तुरे यांनी या वस्तू जप्त करण्यासाठी तसेच कथित कटाचा उलगडा करण्यासाठी पोलिस कोठडी वाढविणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. मूळ तक्रारदारांच्या वतीने ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली.
चौकशीदरम्यान दिव्या शिंदे तपासात सहकार्य करत नाही. माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अंगविक्षेप करणे, आरडाओरड करणे तसेच तीव्र चिंतावस्था (अँक्झायटी अटॅक) आल्याचे सांगून ती माहिती लपवित असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
