Iran Israel War | चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही; इराणचा जगाला इशारा
नवी दिल्ली : Iran Israel War | मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना इराणने जगाला धक्का देणारा इशारा दिला आहे. पर्शियन आखातातील अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून चीनच्या जहाजांना वगळता इतर कोणत्याही देशाच्या जहाजांना प्रवेश दिला जाणार नाही, असे संकेत इराणकडून देण्यात आले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचा दावा करत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने कोणतेही जहाज परवानगीशिवाय प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल या मार्गातून वाहतूक केले जाते. त्यामुळे या मार्गावर निर्बंध आले तर जागतिक तेलपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. इराणने हा इशारा दिल्यानंतर अनेक तेलवाहू जहाजांच्या हालचाली मंदावल्या असून जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या परिस्थितीकडे अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देश लक्ष ठेवून आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार आणि समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीत कोणताही मोठा अडथळा निर्माण झाल्यास त्याचे परिणाम जगभरातील इंधन बाजारावर तात्काळ जाणवू शकतात.
