Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला 14 कोटींना गंडा; कोरोना पूर्वीच्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या नावाने संपर्क साधून केली फसवणुक
पुणे : Pune Crime News | २०१८ पूर्वी ज्या फर्ममार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करत होते, त्याच कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी २ हजार सिलेक्टेड मेंबरसाठी ३ महिन्यांसाठी ऐश्वर्या प्लॅन योजना असल्याचे सांगून त्यात ३०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ वकिलाला १४ कोटी २५ लाख रुपयांना गंडा घातला. ऐश्वर्या प्लॅन ही गुंतवणुकदारासाठी नाही तर सायबर चोरट्यांची स्वत:साठी ची योजना असल्याचे दिसून आले.
याबाबत नारायण पेठेत राहणार्या एका ६८ वर्षाच्या ज्येष्ठ वकिलानी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निर्मल बंग सिक्युरिटीज प्रा. लि. या शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये पूर्वी २०१८ पर्यंत त्यांच्या डीमॅट अकाऊंटद्वारे ट्रेडिंग करीत होते. ऑक्टोंबर २०२५ मध्ये त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. बोलणार्या व्यक्तीने ती निर्मल बंग सिक्युरिटीजच्या मुंबई हेड ऑफिसमधून मॅनेजर दिव्या कपाडिया बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या कपंनीने प्रायमरी ब्लॉक ट्रेडिंगसाठी ऐश्वर्या प्लॅन योजना ३ नोव्हेंबर २०२५ पासून ३ महिन्यांसाठी सुरु करीत असल्याचे सांगतले. त्यासाठी आम्ही २ हजार सिलेक्टेड मेंबर्स घेत असल्याचे सांगितले. त्यात त्यांचे सिलेक्शन झाल्याचे सांगितले. त्याचे निर्मल बंग मध्ये डीमॅट अकाऊंट असल्याने तेथून फोन आल्याचे त्यांना वाटले. त्यामध्ये त्यांनी फिर्यादी यांना ३०० टक्के नफा मिळेल व त्यावर १० टक्के सर्व्हिस चार्जेस द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यावर एका लिंक द्वारे त्यांचे डिमॅट अकाउंट ओपन केले. त्यावरुन त्यांना लॉगईन आयडी व पासवर्ड टाकून ट्रेडिंग करण्यास सांगितले. या अॅप्लीकेशनमध्ये स्टॉकचे सर्व व्यवहार दिसत होते.
त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की, सेबीची परवानगी घेऊन ट्रेडिंगसाठी आमच्या असोसिएटसच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत खाती ओपन केली असून ती फक्त या योजनेसाठी वापरली जाणार आहेत. आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू त्यावेळेस तुम्ही त्यात पैसे ट्रान्सफर करा, असे सांगितले. त्यांना व्ही ५ निर्मल बंग सिक्युरिटीस या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले.
त्यानंतर त्यांनी ३ नोव्हेंबर २०२५ पासून ८२ व्यवहाराद्वारे एकूण १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यावर त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये नफ्यासहित ३९ कोटी २६ लाख ४२ हजार ८०० रुपये दिसत होते. त्यांनी नफा विड्रॉ करावयाचा आहे, असे सांगितल्यावर त्यांना नफ्याच्या १० टक्के कमिशन भरावे लागेल अन्यथा पैसे विड्रॉ करता येणार नाही, असे सांगितले. नफ्यातून कमिशनचे पैसे वजा करुन उरलेले पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी कमिशनचे पैसे भरले. त्यानंतरही त्यांना इन्कम टॅक्स, तसेच सिक्युरिटी डिपॉझिट अशी कारणे देऊन पैसे भरण्यास सांगितले. ते त्यांनी भरले. तरीही त्यांना पैसे विड्रॉ करण्यास नकार दिला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १९३० वर तक्रार केली. पोलीस निरीक्षक संगिता देवकाते तपास करीत आहेत.
