Maharashtra Weather | अरबी समुद्रातून पावसाचं संकट! पुण्यासह 4 जिल्ह्यांत पावसाचा इशारा, हवामानाचा नेमका अंदाज काय?

rains

मुंबई : Maharashtra Weather | राज्यात हिवाळा संपत असताना हवामानाने अचानक करवट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून सकाळी गारवा आणि दुपारी वाढणारी उष्णता असा अनुभव नागरिक घेत आहेत. आता मात्र अरबी समुद्रातून येणारे दमट वारे, उत्तरेकडील ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ आणि दक्षिणेकडील कमी दाबाच्या क्षेत्राच्या संयुक्त परिणामामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत १७ फेब्रुवारीच्या रात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत ढगांचा गडगडाट आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणासह पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज आहे. या बदलामुळे दिवसाच्या तापमानात घट होईल, मात्र वातावरणात आर्द्रता वाढणार असल्याने उकाडा जाणवू शकतो.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता तुलनेने कमी असली तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात किंचित घट झाली आहे. परंतु ढगाळ वातावरण वाढत गेल्यास पुढील काही दिवसांत पुन्हा उष्णतेत वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दरम्यान, दक्षिण भारतात श्रीलंका-तमिळनाडू किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून तेथील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रणालीचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेला राहू शकतो.

एकूणच, उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच राज्यात दोन दिवसांसाठी अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असून, हवामान पुढील काही दिवस सतत बदलत राहण्याची शक्यता आहे.

You may have missed