Mantralaya Bribery Sting Operation | मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाने खळबळ; स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल, क्लार्क अटकेत
मुंबई : मुंबईतील मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात कार्यरत क्लार्क राजू ढेरंगे याचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल परवान्याचे निलंबन रद्द करून देण्यासाठी संबंधिताने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने पैसे देण्यास नकार देत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि ३५ हजार रुपये स्वीकारताना ढेरंगे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओही समोर आला असून त्यात तो “५० घेऊन ये, तुझं काम करून देतो” असे स्पष्ट बोलताना दिसत आहे.
प्राथमिक चौकशीत या कर्मचाऱ्याने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या तो कोठडीत आहे. सरकारी काम करून देण्यासाठी पैसे स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर टीका सुरू झाली असली तरी त्यांनी या प्रकरणाशी स्वतःचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. “माझ्याशी थेट संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
एकंदरीत मंत्रालयातच लाचखोरीचा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाच्या पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
