Mumbai Crime | ब्रेकअप, जातीय टोमणे अन् नैराश्य; 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, मुलीवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

Suicide

मुंबई :  Mumbai Crime | मुंबईच्या वडाळा पूर्व परिसरात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा शिकणारा हा विद्यार्थी ब्रेकअपनंतर नैराश्यात गेल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर प्रेयसीकडून कथित जातीय अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, याप्रकरणी संबंधित मुलीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अनुसूचित जाती/जमाती) कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी आणि मुलगी काही काळापासून प्रेमसंबंधात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर मुलीने त्याच्याशी संबंध तोडले. या ब्रेकअपनंतर तो मानसिकदृष्ट्या खचला होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, संबंध संपल्यानंतर मुलीने त्याला जातिवाचक शब्दांनी हिणवले तसेच अपमानास्पद संदेश पाठवले. या सततच्या मानसिक छळामुळे तो नैराश्यात गेला आणि अखेरीस त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मुलीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

You may have missed