Pune Crime News | एसआयआरच्या मतदार याद्यांच्या विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रमाच्या कर्तव्यात कसुर करणार्या शिक्षक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | एसआयआर (मतदार सखोल पुर्नरिक्षण कार्यक्रम) याच्यामुळे देशभरातील अनेक राज्यात मोठा वादविवादाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातही एसआयआरचे काम सुरु झाले आहे. या विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असता कामावर उपस्थित न राहता कर्तव्यात कसूर केल्याने एक शिक्षक व एका लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख शहनाबाज युनुस (शिक्षक, अॅग्लो ऊर्दु बॉईज हायस्कुल) आणि प्रताप पाटील (लिपिक, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महसुल सहायक अनिल विलास गायकवाड (वय ४२, रा. जांब, ता. इंदापूर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील अनेक राज्यात मतदार याद्यांचे सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम (एस आय आर) हाती घेण्यात आला आहे. बिहार, पश्चिम बंगाल सारख्या राज्यात ही मोहिम पार पडली असून लाखो मतदारांनी नावे रद्द करण्यात आली आहेत. महाराष्ट्रासह २२ राज्यात आता एस आयआरची मोहीम सुरु झाली आहे.
२१४ कॅन्टोंमेट मतदार संघामध्येही एस आय आरचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शेख शहनाबाज आणि प्रताप पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदार त्या ठिकाणी राहतात की नाही याची खात्री करुन घेऊन त्यांची नोंद करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. असे असताना या दोघांनी कोणत्या वाजवी कारणाशिवाय ते कामाला उपस्थित राहिले नाहीत. त्यांना निवडणूक विभागाने वारंवार नोटिसा पाठवून कामावर उपस्थित राहण्यास सांगितले. तरीही त्यांनी या नोटिसांना कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे निवडणूक कामकाज पार पाडण्यास दिरंगाई, टाळाटाळ करुन दिलेल्या कर्तव्यात कसुर केल्याने त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.
मतदार याद्या पुर्ननिरीक्षण कार्यक्रमापाठोपाठ आता जनगणना कार्यक्रमही सुरु झाला आहे. मतदार याद्या पुर्ननिरीक्षण झाल्यानंतर आता शिक्षक व सरकारी कर्मचार्यांना जनगणना नोंदणीसाठी राबविण्यास सुरुवात होत आहे. मतदार याद्या पूर्ननिरीक्षण कार्यक्रमाचा बोझा संपत नाही तोच आता जनगणना नोंदणी सुरु होणार असल्याने शिक्षक, सरकारी कर्मचारी त्रासले आहेत.
