Police Suspended In Pune | येरवडा लॉकअपमधून आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलीस हवालदार निलंबित; चादर देण्याऐवजी लॉकअपमधून बाहेर काढून त्यालाच घेण्यास लावली, संधी साधून गेला होता पळून
पुणे : Police Suspended In Pune | पोक्सो गुन्ह्यासाठी अटक असलेल्या आरोपीने चादर मागितल्यावर चादर देण्याऐवजी त्याला लॉकअपमधून बाहेर काढून बाथरुममधून घेण्यास पाठविला. ही संधी साधून आरोपी बाथरुमच्या काचा काढून पळून गेला होता. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखविल्याने पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत यांनी पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार सचिन शिंदे असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ वाजता येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत घडली होती.
पोक्सोच्या गुन्हात शैलेश राजू मोहिते (वय १८, रा. राज चौक, येरवडा) याला ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ८ फेब्रुवारी रोजी रात्री गार्ड ड्युटीवर पोलीस हवालदार शिंदे व विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार हनवते हे होते. शैलेश मोहिते याने हनवते याच्याकडे चादरीची मागणी केली. तेव्हा हनवते यांनी आरोपीला स्वत: चादर देणे अभिप्रेत असताना राजू मोहिते याला लॉकअपमधून बाहेर काढून लॉकअपमधील बाथरुमच्या बाजूला चादर घेण्यासाठी पाठविले.
परंतु, या आरोपीसोबत जाणे गरजेचे असता आरोपीला एकट्यास पाठवून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तसेच यावेळी गार्ड अंमलदार व इतर पोलीस अंमलदार हजर नसल्याने बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून तो पळून गेला. आरोपी पळून गेल्याने येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकअप गार्ड व अंमलदार यांनी या आरोपीवर निगराणी ठेवणे आवश्यक असताना देखील त्याचे सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता कर्तव्यात हलगर्जीपणा करुन कसुरी केल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत यांनी पोलीस हवालदार सचिन शिंदे यांना निलंबित केले आहे.
