Pune ACB Trap Case | जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्याकरीता लाच घेणार्या कंत्राटी कामगारासह खाजगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्याकरीता २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरुर तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
कंत्राटी कामगार सुरज शरद थोरात Suraj Sharad Thorat (वय ३४, रा. नवोदय कॉलनी, कडेगाव, अहिल्यानगर) आणि खासगी व्यक्ती महेश बाबुराव भोसले Mahesh Baburao Bhosale (वय ४५, रा. बाबुरावनगर, गंगा रेसिडेन्सी, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३३ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांची शिरुरमधील घोटी मळा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीचे सातबारा व फेरफार नकला मिळण्याकरीता तहसील कार्यालयात २७ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. १२ मार्च रोजी अभिलेख कक्ष येथे गेले असता त्यांची भेट कंत्राटी सुपरवायझर सुरज थोरात यांच्याशी झाली. त्यांनी तक्रारदार यांचे सातबारा व फेरफारच्या नकला काढून देण्याकरीता २ हजार रुपये द्यावे लागतील, अशी तक्रार १८ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीची पडताळणी २० मार्च रोजी करण्यात आली. त्यात सुरज थोरात याने नकला देण्यासाठी २ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून २ हजारांची लाच स्वीकारताना सुरज थोरात याला पकडण्यात आले. त्याला लाच घेण्यास प्रोत्साहन देणार्या महेश भोसले यालाही पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांचे सहकारी यांनी केली़ सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.
