Pune Congress | पीएमपीमधे महिला प्रवाशांना सुरक्षितता द्या; पुणे शहर महिला काँग्रेसची मागणी
पुणे : Pune Congress | महिला बस प्रवाशांना सुरक्षितता द्या, अशा मागणीचे निवेदन पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला आज (शुक्रवारी) दिले.
नोकरी आणि शिक्षण या कारणांनी पीएमपीतून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य महिलांची संख्या जास्त आहे. महिलांना अर्ध्या तासांहून अधिक काळ पीएमपी थांब्यांवर थांबावे लागते. तिथे एवढा वेळ थांबणे महिला प्रवाशांना धोक्याचे वाटते. महिलांना छेडछाड करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना तिथे सुरक्षित वाटावे, यासाठी बस थांब्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, पीएमपी अधिकाऱ्यांनी बस थांब्यांवर आणि ऑनरूटही अचानक भेटी द्याव्यात, बस थांब्यांवर आणि बसमध्ये आपत्कालीन मदत यंत्रणा असाव्यात, बसमध्ये पॅनिक बटण असावे, बसमध्ये तसेच बस थांब्यांवर सीसीटीव्ही बसवावेत, पावसाळ्यात निवाऱ्याच्या दष्टीने प्रत्येक थांब्यावर शेड असावी, महिला प्रवाशांना सुरक्षितता मिळण्याच्या दृष्टीने बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना प्रशिक्षण देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना दिलेले निवेदन त्यांच्यावतीने सह व्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे यांनी स्वीकारले. निवेदनातील सर्व मुद्दे पोरे यांनी गांभीर्याने ऐकले आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पुणे शहर महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळात अध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका सायरा शेख, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, मनोरमा चौधरी, रुपाली पवार, कल्पना शिंदे, अंजली सोलापुरे आणि ज्योती अडागळे या पदिधिकाऱ्यांचा समावेश होता.
