Pune Court News | भाजप नगरसेवकाचे पद रद्द करण्यासाठी पत्नीनेच घेतली न्यायालयात धाव; काय आहे नेमके प्रकरण वाचा सविस्तर

Pune Court News | BJP corporator's wife moves court to cancel his post; Read the exact case in detail

पिंपरी/ पुणे : Pune Court News | भारती जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकाविरुद्ध त्याच्या पत्नीनेच न्यायालयात धाव घेतली असून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांनी प्रभाग क्रमांक २५ ए वाकड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम वाघमारे यांचा १० हजार २१८ मतांनी पराभव करुन निवडुन आले आहेत. त्यांच्या पत्नी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनी अपक्ष म्हणून निवडून लढविली होती. उमेदवारी अर्जात कुणाल वाव्हळकर यांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी अवैध बांधकाम केले असून खोटे प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध घोषित करुन त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी निवडणुक याचिकेद्वारे केली आहे.

कुणाल वाव्हळकर यांनी वाकड येथील सर्व्हे नं. १७७ व १७८ या शासनाच्या/ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करुन अनेक बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. अपात्रतेची भीती असल्यामुळे त्यांनी ही बाब नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात योग्य प्रकारे नमूद करण्यात आलेली नाही. संबंधित निवडणूक आयोगाची दिशाभूल करुन जाणीवपूर्वक माहिती लपविलेली आहे.

त्याचबरोबर नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये कौटुंबिक माहितीसंदर्भात चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आमच्या दोघांच्या कायदेशीर विवाहातून आम्हाला एकच मुलगी असताना या प्रतिज्ञापत्रात दोन अपत्य असल्याचे नमूद करुन निवडणूक आयोगाची व शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल करुन माझी फसवणूक केलेली आहे.

याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर ऑनलाईन तक्रार देण्यात आलेली आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी वाकड प्रभाग क्रमांक २५ चे निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्याकडे रितसर लेखी हरकत घेतलेली होती. तरीसुद्धा संबंधित अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही. या उमेदवाराला नोटीस काढून खुलासा मागणे कायद्याने गरजेचे होते, तसे न करता सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कुणाल वाव्हळकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

महापालिका निवडणुक काळातही पती पत्नी एकमेकांविरुद्ध उभे असल्याचा मुद्दा वाकडमध्ये गाजला होता. कुणाल आणि प्रज्ञा वाव्हळकर यांचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक कारणावरुन त्यांचे पटले नाही. त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. प्रज्ञा वाव्हळकर यांनी कुणाल वाव्हळकर यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रज्ञा वाव्हळकर यांना रितसर पोटगी दिली असल्याचे कुणाल वाव्हळकर यांचे म्हणणे आहे. निवडणुक काळात कुणाल वाव्हळकर यांनी प्रज्ञा वाव्हळकर यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

You may have missed