Pune Crime News | रामनवमी मिरवणुकीतील भांडणावरुन टोळक्याने रिक्षाचालक तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन केले गंभीर जखमी, मुंढवा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
पुणे : Pune Crime News | रामनवमी मिरवणुकीत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन बी टी कवडे रोड येथे टोळक्याने रिक्षाचालक तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंढवा पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अक्षय आनंद गवळी (वय ३०, रा. कात्रज)असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (वय २७, रा. शक्तीनगर, बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी काशीराम मोघे (वय ३०), अभिषेक मोघे (वय २७), नंदु नवनाथ थोरात Nandu Navnath Thorat (वय २९, तिघे रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) व त्यांच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसर रेल्वे स्टेशन रोडवरील जाधव वस्तीजवळ गुरुवारी रात्री ११ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी हे रिक्षाचालक असून त्यांचा मोठा भाऊ अक्षय गवळी हा ही रिक्षाचालक आहे. अक्षय गवळी हा रामनवमी निमित्त कात्रजहून घोरपडी येथील फिर्यादीच्या घरी आला होता. त्यानंतर येथील अखंड हिंदु संघाचे मिरवणुकीत सामील झाले होते. या मिरवणुकीत कोणाचेही फोटो किंवा बॅनर न लावण्याबाबत ठरले होते. परंतु, मिरवणुकीमध्ये काशीराम मोघे याचा बॅनर लावलेला दिसून आला. त्यामुळे त्याला मिरवणुकीमध्ये इतर लोकांनी तसेच फिर्यादी यांनी विरोध केला होता. त्यामुळे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नंदु थोरात याने तुम्हाला लय माज आला का रे , असे म्हणून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांच्या गालावर चापट मारली. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. काशीराम मोघे व इतरांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांची भांडणे मिटवली.
मिरवणुक संपल्यानंतर अजिंक्य गवळी व त्याचे मित्र अमित परदेशी हा मांजरी येथील झेड कॉर्नरला रहात असल्याने त्याला सोडवण्यासाठी अक्षय गवळी, विनायक म्हेत्रे व विनायकचा कामगार हे मोटारसायकलवरुन जात होते. ताडीगुत्ता चौक येथे सिग्नलला असताना काशीराम मोघे, नंदु थोरात यांनी पाहिले. त्यांनी अक्षयला शिवीगाळ केली. तेव्हा ते तेथून घाबरुन हडपसर रेल्वे स्टेशनवरुन जात असताना रात्री ११ वाजता त्यांनी जाधव वस्ती येथे आडविले. रामनवमी मिरवणुकीत झालेल्या भांडणावरुन त्यांनी तुम्हाला लय माज आला आहे, असे म्हणून काशीराम मोघे व अभिषेक मोघे यांनी हातातील धारदार हत्याराने अक्षय गवळी याच्या डोक्यात, पोटावर, पायावर व हातावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी जात असताना नंदु थोरात व इतर तिघांनी अमित परदेशी, विनायक म्हेत्रे व त्यांच्या कामगार यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक तपास करीत आहेत़
