Pune Crime News | पिस्टलातून गोळी झाडली, पण गोळी न उडल्याने पिस्टलच्या उलट्या लोखंडी बाजूने तरुणाच्या डोक्यात मारून केले जखमी, खडक पोलिसांनी 4 जणांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून हनुमान जयंतीचा फलक लावणार्‍या तरुणावर टोळक्यातील एकाने पिस्टलातून गोळीबार केला. सुदैवाने पिस्टलातून गोळी उडली नाही. तेव्हा त्याने पिस्टलच्या उलट्या लोखंडी बाजूने डोक्यात मारुन जखमी केले. त्याच्या साथीदारांनी इतरांना मारहाण केली. याबाबत खडक पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.

स्वप्नील सुनिल पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाटणकर याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मितेश विनोद माने Mitesh Vinod Mane (वय १९,रा. घोरपडी पेठ), सार्थक शिशुपालक गावडे (वय १८, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ), महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे Mahendra alias Vasco Ramchandra Kamble (वय ४०, रा. एच पी लोहियानगर), चैतन्य ऊर्फ सार्थक निलेश शिवपालक Chaitanya alias Sarthak Nilesh Shivpal (वय २०, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) यांना अटक केली आहे. वरद महेंद्र कांबळे, अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंज पेठेतील वज्र मारुती मंदिराजवळ २५ मार्च रोजी रात्री १ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील पाटणकर हे वज्र मारुती मंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या मंडळातील मुलगा श्रीकांत धनगर याचे वरद कांबळे, वास्को कांबळे यांच्यासोबत वाद झाला होता. श्रीकांत धनगर पाटणकर याचा चांगला मित्र असल्याने तेव्हापासून वरद कांबळे व वास्को कांबळे हे पाटणकरसह मंडळातील मुलांबरोबर खुनशी वृत्तीने वागत आहेत.

२५ मार्च रोजी हनुमान जन्मोत्सवाचे फलक मंडळातील मुले लावत होती. त्यावेळी वरद कांबळे गटातील मुले गाडीवरुन आली. त्यांच्याकडे खुन्नसने बघु लागले. तेव्हा पाटणकर याने कशासाठी बघत आहेत, असे विचारले. त्यानंतर ते निघून गेले. अर्ध्या तासानंतर अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, वरद कांबळे, वास्को कांबळे तेथे आले. त्यावेळी अनिश धडे याने पाटणकर कडे बोट दाखवून हाच तो स्वप्नील पाटणकर असे सय्यदला सांगितले. त्याचवेळी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्टल पाटणकरवर रोखली व फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिस्टलमधून फायर झाला नाही. त्यामुळे त्याने पिस्टलच्या उलट्या लोखंडी बाजुने पाटणकर याच्या डोक्यात मारले. त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. हे पाहून इतर जण धावले. तेव्हा अनिश धडे व ओम लोंढे यांनी त्यांच्याकडील कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. इतरांनी दगड व काचेची बाटल्या फेकून मारत तेथून निघून गेले. खडक पोलिसांनी चौघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.

You may have missed