Pune Crime News | जुन्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करुन एजंटाने फायनान्स कंपनीला लावला 52 लाखांचा चुना; एजंट दोघा पतीपत्नीविरुद्ध  गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | जुन्या गाड्याच्या खरेदी विक्रीसाठी फायनान्स पुरविणार्‍या कंपनीला व्यवसाय मिळवुन देताना खर्‍या प्रकरणाबरोबरच काही प्रकरणात बनावट कागदपत्रे पुरवून त्याद्वारे १२ जणांना कर्ज मंजूर करवुन घेऊन एजंट असलेल्या दोघा पतीपत्नीने फायनान्स कंपनीला ५२ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

याबाबत सतिश किसनराव कोळी (वय ४४, रा. लक्ष्मी व्हाईट, नर्‍हे) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंबादास भाऊराव मडके (Ambadas Bhaurao Madke) आणि त्याची पत्नी अश्विनी अशोक लोहकरे (दोघे रा. खडकवासला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ जुलै २०२२ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिश कोळी हे दुगर फायनान्समध्ये शाखा प्रमुख आहेत. दुगर फायनान्स ही जुन्या वाहनांना कर्ज पुरवठा करण्याचे काम करते. अंबादास मडके हा २०१९ पासून त्यांच्या कार्यालयात कर्ज प्रकरणाची फाईल घेऊन येत होता. त्याने कंपनीकडून आतापर्यंत साधारण ६० ते ७० कर्ज प्रकरणे केली असल्याने त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याने ५ जुलै २०२२ रोजी त्यांना खराडी येथील दरबार हॉटेलमध्ये बोलावून घेतले. हॉटेलमध्ये गाडीच्या व्यवहार व कर्जविषयक बोलणे करुन कागदपत्रे दिल्यानंतर त्यांना कर्ज देण्यास फिर्यादी तयार झाले.

मडके हा एजंट म्हणून जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करताना फायनान्स कंपनीला व्यवसायही मिळवुन देत होता. त्याने काही खरी प्रकरणे करुन त्यात एखादे बनावट कागदपत्रे बनवुन त्यालाही कर्ज मंजूर करुन घेत होता. फिर्यादी यांना त्या जुन्या गाड्या दाखवून तो कर्ज मंजूर करवुन घेत असे. अशा प्रकारे अनेक कर्ज मंजुरी करुन घेताना त्याने १२ प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करुन ५२ लाख ४० हजार रुपयांची कर्ज प्रकरणे करुन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तपास करीत आहेत.

You may have missed