Pune Crime News | सराईत गुन्हेगारांकडून खंडणी विरोधी पथकाने गावठी 4 पिस्टल, 5 जिवंत काडतुस केले जप्त
पुणे : Pune Crime News | भांडणातील वचपा काढण्यासाठी शस्त्र बाळगणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तुल व ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी Rohit Durgesh Dharmadhikari (वय २४, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) आणि अभिषेक राजु टेंकल Abhishek Raju Tankal (वय २३, रा. विष्णु कृपानगर, जुने शिवाजीनगर बस स्टँडमागे, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहित धर्माधिकारी हा बेकायदा गावठी पिस्टल विक्रीमध्ये माहिर आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टचे सांगवी व इतर पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. अभिषेक टेंकल याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट तसेच सरकारी कर्मचार्यावर हल्ला करुन कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.
रोहित धर्माधिकारी याचे सांगवीमध्ये एकाशी भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तसेच विक्रीसाठी त्याने ही शस्त्रे बाळगली होती. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित धर्माधिकारी हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौकात येणार असून त्याच्याकडे शस्त्रे आहेत. या बातमीची खात्री करुन पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकात सापळा रचला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, रवींद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, रोहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी केली आहे.
