Pune Crime News | ‘‘तुमने पोलीस को फोन नही करना चाहिए था, ये तुमको महंगा पडेगा’’; कोंढव्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, उपचारासाठी ससून रुग्णालयात आल्यावरही एकमेकांवर केले वार

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | भांडणे चालली असल्याचे पाहून त्याने ११२ वर फोन करुन पोलिसांची मदत मागविली. तेव्हा दोघांनी त्याला तुमने पोलीस को फोन नही करना चाहिए था, तुमको महंगा पडेगा, असे म्हणून त्याला मारहाण केली. दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर ते ससून रुग्णालयात उपचारासाठी गेले असताना तेथेही त्यांनी एकमेकांवर वार केले. या घटनेत दोन्ही गटातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कोंढवा पोलिसांनी दोन्ही गटातील प्रत्येकी ८ ते १० जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

याबाबत असलम हनीफ खान (वय ४२, रा. कुबेरा गार्डन, एनआयबीएम रोड, कोढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत असलम खान व त्यांचा मोठा भाऊ सलीम खान आणि पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी शफाक अशफाक शेख (वय २९, रा. भाग्यलक्ष्मी टॉवर, भवानी पेठ), शहबाज झाकीर खान (वय ३१, रा. भवानी पेठ) यांना अटक केली आहे. तसेच त्यांचे ७ ते ८ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी बडी रात असल्याने फिर्यादी कौसरबाग येथे गेले होते. मशिदीच्या गेटच्या बाहेर काही जण एकमेकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत होते. ते पाहून असलम खान यांनी ११२ वर कॉल करुन पोलीस मदत मागविली. त्यानंतर ते मुलांना घरी सोडून पुन्हा गरीब नवाज मशिदीकडे जात असताना अफाक व शफाक यांनी तु पोलिसांना फोन करुन चुक केलीस, त्यावेळी त्यांनी तुम्ही जे वागत होतात ते चुकीचे होते, म्हणून पोलिसांना फोन केला. तेव्हा त्यांनी ‘‘तुमने पोलीस को फोन नही करना चाहिए था, ये तुमको महंगा पडेगा,’’ असे म्हणून ते निघून गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रात्री ते लकी फिश हॉटेलकडे जाणार्‍या रोडवर चालत होते. अफाक व शफाक व त्यांच्यासोबत इतर ३ जण आले. त्यांनी हत्याराने असलम खान यांना मारण्याचा प्रयत्न केला.

शफाक याने लोखंडी फायटरने कपाळावर जोरात ठोसा मारला. ते पळून गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. ससून रुग्णालयात त्यांचा मोठा भाऊ सलीम खान व त्यांचा मुलगा अब्दुल व इतर काही मित्र आले. ससून रुग्णालयाच्या गेटवर बॉब नावाच्या तरुणाने अफाक और शफाक मेरे भाई लोग है, तुम लोग ने बहुत गलत कर डाले, असे म्हणून त्यांच्याकडील एकाने धारदार हत्याराने असलम यांच्यावर वार केला. तसेच त्यांचा भाऊ सलीम खान यांच्या पोटात हत्यार भोकसून त्यांना गंभीर जखमी केले. सलीम खान यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा अब्दुल समद हा आला असताना त्याच्या ही मांडीला एकाने भोकसून गंभीर जखमी केले. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

याविरोधात शफाक अशफाक शेख (वय २९, रा. कोंढवा) याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोहम्मद जिब्रान जुनेद सय्यद (वय ३०, रा. कौसरबाग सोसायटी, कोंढवा) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार असलम खान, फरीद लाला, सलीम लाला, शरीफ बंटाया, उबेद लाला, जिब्रान, अस्वर इतर पाच ते सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बडी रात ची नमाज पठण झाल्यानंतर शफाक यांचा असलम खान यांच्यासोबत पार्किंग वरुन वाद झाला होता. त्यावेळी शफाक सॉरी म्हणून तेथून निघुन गेले होते. दुसर्‍या दिवशी ते रात्री ९ वाजता मित्रांबरोबर करीम कॅफे येथे बसले होते. त्यावेळी असलम खान व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी ‘‘कल ज्यादा बात कर रहा था तु, मेरे को जानता नही मै कौन हू’’ असे म्हणून असलम याने हाताने चापट मारली. फरीद लाला याने पाठीमागून हत्याराने मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. तेथे ते पोहचले. त्यांना पाहण्यासाठी त्याचे नातेवाईक व इतर आले होते. शेहबाज खान, सुफियान शेख, अरबाज शेख हे पाणी आणण्यासाठी गेटवर गेले होते. त्यावेळी असलम खान व इतर तेथे आले. त्यांनी सुफियान याला घेरुन असलम खान याने हत्याराने त्याच्यावर वार केले. तेव्हा शफाक हे त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही वार करुन गंभीर जखमी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

You may have missed