Pune Crime News | बनावट व्यक्ती उभी करुन खरेदी खत करुन बनावट सह्या करुन कुलमुखत्यार पत्र दिल्याचे दर्शविणार्या छाजेड, मेहता, सुभाष दुगड, निलेश तोष्णिवालसह 7 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कुलमुखत्यार पत्र दिले नसताना बनावट व्यक्ती उभी करुन बनावट सह्या करुन बनावट कुलमुखत्यार पत्राच्या आधारे खरेदी खत करुन ८० वर्षाच्या वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सरोज विमल छाजेड Saroj Vimal Chhajed (रा. हाईट पार्क, मार्केटयार्ड), सुमित्रा फत्तेचंद मेहता Sumitra Fattechand Mehta (वय ५३, रा. हाईट पार्क, मार्केटयार्ड), सुभाष उत्तमचंद दुगड Subhash Uttam Chand Dugad (रा. श्री गुरु गणेश सहकारी सोसायटी, गंगाधाम चौक, कोंढवा रोड, बिबवेवाडी), विनोद सुभाष दुगड Vinod Subhash Duggad (रा. श्री गुरु गणेश सोसायटी, बिबवेवाडी), निलेश रमेश तोष्णीवाल Nilesh Ramesh Toshniwal (रा. लेक टाऊन सोसायटी, कात्रज), वंदना दिनेश राठोड Vandana Dinesh Rathod (रा. सुफातनाथ इको हौसिंग सोसायटी, कमला नर्सिंग होममागे, मार्केटयार्ड), मालव जयंत शहा Malav Jayant Shah (रा. डेक्कन जिमखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत हरिभाऊ नारायण कापरे (वय ८०, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकर नगर येथील सर्व्हे नं. ८०/३/१४ (जुना) याबाबत १९९० ते २०२० दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिभाऊ कापरे हे कासारवाडी येथील अल्फा लावल कंपनीत कामाला होते. त्यानंतर त्यांनी हडपसर येथे रुपाली नावाचा हॉटेल व्यवसाय केला. शेतीची आवड असल्याने ते १९९२ पासून जमीन खरेदी करुन नेवासा येथे रहात आहेत.
त्यांचे आजोबा गोविंद रामा टिळेकर यांची कोंढवा येथे २७ गुंठे जमीन आहे. आजोबांना चार मुली होती. आजोबांच्या मृत्यु पश्चात ही मिळकत आजी सोनाबाई गोंविद टिळेकर यांच्या नावे सात बारा उतारावर नोंद झाली. त्यापैकी प्रत्येकी १३ गुंठे जमीन सरोज विमल छाजेड, सुमित्रा फत्तेचंद मेहता यांनी बनावट खरेदीचा दस्त करुन त्यांची आई व मावशी यांनी कुलमुखत्यार पत्र दिलेले दर्शवून बनावट व्यक्ती उभा करुन बनावट सह्या करुन खरेदी खत नोंदणी केलेले आहे. तसेच १ गुंठा जमीन २०१३ मध्ये सुभाष उत्तमचंद दुगड यांनी त्यांना १९९२ साली आई व मावशी यांच्या तर्फे फिर्यादी यांनी कुलमुखत्यार पत्र दिलेले नसताना बनावट व्यक्ती उभी करुन बनावट सही करुन खरेदी खत नोंदणी करुन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.
