Pune Crime News | भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यु; बिबवेवाडीमधील इंदिरानगर येथील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करुन न देता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मिथुन नारायण चव्हाण (वय ३४, रा. महावीरनगर, सुखसागरनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार हरिनरसिंग राठोड (रा. जगताप डेअरीजवळ, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चव्हाण यांची पत्नी श्रीदेवी चव्हाण (वय २१, मूळ रा. किनीमोड तांडा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हिने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात एका घराचे बांधकाम पाडण्याचे काम ७ फेब्रुवारी रोजी सुरू होते. हे काम ठेकेदार राठोड याला देण्यात आले होते. भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. राडारोड्याखाली सापडून बांधकाम मजूर चव्हाण व इतर कामगार गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मिथुन चव्हाण यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम मजुराच्या सुरक्षेविषयक उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने उपलब्ध न करुन दिल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
