Pune Crime News | ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून तीन लाखांची फसवणूक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नावाने दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका नागरिकाची सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फिर्यादीला आरटीओच्या नावाने दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठविले. हे चलन APK फाईलच्या स्वरूपात पाठविण्यात आले होते.

फिर्यादीचा मोबाइल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला होता. संबंधित APK फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी तांत्रिक पद्धतीने मोबाइलचा ताबा घेतल्याचा आरोप आहे.

यानंतर चोरट्यांनी फिर्यादीच्या बँक खात्यातून तीन लाख चार हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात वळविले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुळे करत आहेत.

You may have missed