Pune Crime News | आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणारा गुंड स्थानबद्ध ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची कारवाई, अमरावती कारागृहात रवागनी
पुणे : Pune Crime News | आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या गुंडावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी डी ए अंतर्गत कारवाई करुन त्याची एक वर्षासाठी अमरावती कारागृहात रवानगी केली आहे.
मंथन सचिन भालेराव Manthan Sachin Bhalerao (वय १९, रा़ भवानी पेठ) असे या गुंडाचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळी नेस्तनाबूत करण्याची मोहिम उघडली आहे. या टोळीविरुद्ध सर्व पातळीवर कारवाई सुरु आहे. त्यातून समर्थ पोलीस ठाण्यातील मागील काही महिन्यातील ही ५ वी कारवाई आहे.
मंथन भालेराव याच्यावर यापूर्वी मारामारीचे ३ गुन्हे दाखल होते. त्याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस इंस्टाग्राम अकाऊंटवर ठेवले होते. त्यावेळी समर्थ पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्यासाठी पोलीस आयुक्तांनी कारवाई करुन कठोर संदेश दिला आहे. समर्थ पोलिसांनी मंथन भालेराव याच्यावर एम पी डी ए कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. त्याला मान्यता देत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंथन भालेराव याला एक वर्ष अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. समर्थ पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करुन त्याला अमरावती कारागृहात ठेवले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, पोलीस हवालदार प्रसाद दोड्यानूर, हवालदार जोरकर, वाघेरे, दराडे, शेख यांनी केली आहे.
