Pune Crime News | पुणे : कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने चौघा भावांना केली अटक
पुणे : Pune Crime News | कबुतर चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण करुन खांबाला बांधून ठेवल्याने प्रकृती ढासळून त्याचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाने या तरुणाला मारहाण करणार्या चौघा भावांना अटक केली आहे.
गौरव विजयकुमार माजी Gaurav Vijayakumar Maji (वय २२), सचिन विजयकुमार माजी Sachin Vijaykumar Maji (वय २३), मोनु विजयकुमार माजी Monu Vijaykumar Maji (वय २६), बंटी विजयकुमार माजी Banty Vijaykumar Maji (वय १८, सर्व रा. शंकर मठ, पवर इन्क्लेव्ह सोसायटी, वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वैदुवाडी येथील कबुतराच्या ढाबळीजवळ तरुण उभे असल्याचे दिसल्याने ते कबुतर चोरण्यासाठी आले असावेत, अशा संशयावरुन ५ जणांनी लाकडी बॅटने तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण करुन तरुणाला गंभीर जखमी केले. त्याला उलटी होऊ लागल्याने त्यांनी अपघाताचा बनाव करुन त्यास अॅम्बुलन्समधून ससून हॉस्पिटलमध्ये आणल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना कळविली. त्यानंतर पोलीस अंमलदार राऊत व रोकडे हे ससून रुग्णालयात गेले.
अॅम्ब्युलन्समधून आणलेल्या तरुणाचा मृत्यु झाल्याचे समजले. त्याला रुग्णालयात घेऊन येणार्या तरुणांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आमच्या घरासमोर आमची एक कबुतराची ढाबळ आहे. पहाटेच्या सुमारास कुत्री ओरडल्याने आम्ही बाहेर पाहिल्यावर त्या ढाबळीजवळ हा तरुण संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसले. कबुतर चोरण्यासाठी तो आला असावा, असे आम्हाला वाटल्याने आम्ही घरातील ४ भाऊ व मित्र असे ५ जणांनी मिळून त्याला लाकडी बॅटने तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्याला कबुतराच्या ढाबळीस बांधुन ठेवले. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तो घाबरल्यासारखे करु लागल्याने त्याला ससून रुग्णालयात आणले. तेथे उलटी होऊन त्याचा मृत्यु झाला.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे इतर मारहाण करणार्या भावांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनीही अशीच हकीकत सांगितल्याने त्यांना अधिक तपासासाठी वानवडी पोलिसांच्या हवाली केले.
