Pune Crime News | आईनेच मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आईला केली अटक
पुणे : Pune Crime News | जन्मदात्या आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाने (एएचयू) सहकारनगर भागातील एका सदनिकेत छापा टाकून मुलीची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली.
सहकारनगर भागातील एका सोसायटीत आईच अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशा खापरे यांना मिळाली़ त्यानंतर सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवुन खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदनिकेत छापा टाकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मुलीकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, किरण बरडे, वैशाली खेडेकर यांनी केली.
