Pune Crime News | रुपयांच्या बदल्यात डॉलर देण्याच्या नावाखाली तरुणाला तिघांनी घातला साडेसात लाखांना गंडा
पुणे : Pune Crime News | परदेशी जाण्यासाठी शेतकरी तरुणाला डॉलरची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन तिघांनी रुपयांच्या बदल्यात डॉलर देतो, असे सांगून रस्त्यात थांबायला सांगून पैसे घेऊन गेले. डॉलर आणून देतो, असे सांगून तरुण शेतकर्याला ७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला.
याबाबत अरविंद सुरेश घाडगे (वय २८, रा. जयवंत कॉम्प्लेक्स, कळस) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रसन्न मंडावले, शिवम भोजने आणि राजेश म्हस्के (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे – अहिल्यानगर रोडवरील विमाननगरमधील फोर पॉईंट हॉटेल समोर १३ मार्च रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती करत असून त्यांचा व्यापारही आहे. ते शेअर मार्केटचा अभ्यास करत आहे. एक वर्षापूर्वी त्यासाठी ते कोल्हापूरला गेले असताना तेथे प्रसन्न मंडावले यांची शेअर मार्केट क्लासमध्ये ओळख झाली होती. त्यांना परदेशात फिरायला जायचे असल्याने त्यांना डॉलरची आवश्यकता होती. प्रसन्न मंडावले याने ३ मार्च रोजी फोन करुन सांगितले की, माझ्या ओळखीचा एक शिवम भोजने माझ्या खूप जवळचा आहे. त्याची जबाबदारी मी घेईन, असे सांगून त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तो सातत्याने फोन करुन करन्सी एक्सचेंजचा व्यवहार कधी करायचा, आमचा माणूस पुण्यात आलेला आहे, असे बोलत होता.
१३ मार्च रोजी प्रसन्न मंडावले याने फोन करुन फोर पॉईंट हॉटेलबाहेर बोलवले. तेथे शिवम भोजने याला भेटून करन्सी एक्सचेंजचे काम करुन घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते आपली कार घेऊन सायंकाळी तेथे गेले. तेथे शिवम भोजने याने त्यांची कार ओळखली. ते होंडा सिटी कारमधील पुढील सीटवर येऊन बसले. तो म्हणाला की, आमचे सर १० मिनिटांच्या अंतरावर गाडीमध्ये बसलेले आहेत. ते कधीही समोरासमोर व्यवहार करत नाहीत. आता तुम्ही मला तुमची कॅश दिल्यानंतर १० ते १५ मिनिटात तुमच्या कॅशच्या बदल्यात मी तुम्हाला डॉलर करन्सी आणून देईल. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी कारच्या डिक्कीत ठेवलेले ७ लाख ५० हजार रुपये शिवम भोजने याला दिले. तो रिक्षा करुन निघून गेला.
त्यांनी १५ मिनिटे वाट पाहिल्यावर प्रसन्न मंडावले याला फोन करुन विचारले. तेव्हा त्याने ट्रॉफिकमध्ये असेल येईल, असे सांगितले. त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही भोजने आलाच नाही. प्रसन्न मंडावले याने त्याचा नंबर दिला नाही. फिर्यादी यांनी मी पोलिसांकडे तक्रार करेन, असे सांगितल्यावर मंडावले याने शिवम भोजने हा राजेश म्हसके याचा मित्र आहे. राजेश म्हस्के याचे नाव यात घेऊ नको, तो खुप मोठा माणूस आहे, तो मला त्रास देईल, असे सांगितले. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने व राजेश म्हस्के यांनी संगनमत करुन फिर्यादी यांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. या तिघांनी आपले मोबाईल बंद ठेवले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करीत आहेत.
