Pune Festival | ‘बालभारती’च्या 60 वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा पुणे फेस्टिव्हलकडून गौरव ! संचालिका अनुराधा ओक यांचा सन्मान

Pune Festival | Pune Festival honors ‘Balbharati’s’ 60-year educational journey! Director Anuradha Oak felicitated.

अनुराधा ओक यांच्याकडून वाचनसंस्कृती रुजविण्यावर भर देण्याचे आवाहन

पुणे : Pune Festival | ‘‘कोठारी आयोगाने प्रत्येक राज्यात स्वतंत्र पाठ्यपुस्तक निर्मिती संस्था असावी, अशी शिफारस केली होती. त्यानंतर बालभारतीचा प्रवास सुरू झाला आणि आज संस्थेने ६० वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.’’ बालभारतीकडून मोठ्या प्रमाणावर विविध १० भाषांमध्ये १० कोटींहून अधिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. यंदा एकाच वर्षात चार इयत्तांची पुस्तके प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक काम संस्थेने केले आहे. आधुनिक माध्यमांचा वापर करून पुस्तकांचे प्रभावीपणे प्रसार व वितरण करण्यावरही भर दिला जात आहे. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ६६ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना सहा पुस्तकांचे संच देण्यात आल्याचे बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हल तर्फे ‘बालभारती’च्या ६० वर्षपूर्तीनिमित्त करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत गेली सहा दशके महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’च्या ६० वर्षांच्या कार्याचा पुणे फेस्टिव्हलतर्फे गौरव करण्यात आला. बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचा पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते गुरुवारी सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते.

अनुराधा ओक पुढे म्हणाल्या की ‘‘आज मुलांचा स्क्रीन टाइम वाढत असून वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे मुलांना पुन्हा वाचनसंस्कृतीकडे वळविण्याची गरज आहे. मुल हे आमचे दैवत आहे. ‘किशोर’ मासिक तोट्यात असले तरी ते कमीत कमी दरात मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किशोर आणि बालभारती आता एकरूप झाले आहेत. पाठ्यपुस्तक निर्मितीबरोबरच वाचनसंस्कृती रुजविण्याचे कामही बालभारती करीत आहे,’’ असे त्यांनी नमूद केले. बालभारतीची मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा जतन करण्यासाठी पुणेकरांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘बालभारती’ची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा अविभाज्य भाग बनलेल्या या संस्थेच्या कार्याचा गौरव पुणे फेस्टिव्हल तर्फे करण्यात आला याचा आनंद आहे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘पुणे फेस्टिव्हल केवळ कला-संस्कृती जोपासण्याचे काम करीत नाही, तर कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचाही गौरव करतो. बालभारती ही पुण्याची आणि महाराष्ट्राची महत्त्वाची संस्था आहे. राज्याच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत तिचे योगदान मोठे आहे. आजचा सन्मान केवळ संचालिकेचा नसून बालभारतीतील आजवरच्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या अथक परिश्रमांचा आहे. संस्कृती जपायची असेल तर शिक्षण जपावे लागेल आणि शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा लागेल.’’

उल्हास पवार यांनी बालभारतीच्या कार्याचे कौतुक करताना संस्थेला शासनाने अधिक पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली. ‘‘बालभारतीने अनेक भाषांमध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. साने गुरुजींच्या आंतरभारतीच्या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देणारे काम या संस्थेने केले आहे. अनेक नामवंत लेखक, कवी आणि साहित्यिक बालभारतीशी जोडले गेले आहेत. ‘पसायदान’चा उर्दू अनुवादही संस्थेने प्रसिद्ध केला आहे. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्याची वितरण यंत्रणाही तितकीच महत्त्वाची आहे. लहानपणापासून विद्यार्थ्यांची सामाजिक व शैक्षणिक जडणघडण करण्याचे मोठे काम बालभारतीने केले आहे,’’ असे पवार म्हणाले.

यावेळी ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांचा पुणे फेस्टिव्हलतर्फे, तर उल्हास पवार यांचा बालभारतीतर्फे सन्मान करण्यात आला. बालभारतीतील कर्मचारीवर्गाच्या कमतरतेबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन विश्वस्त मोहन टिल्लू यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी हंसध्वनी रागातील ‘वातापी गणपती’ हे गणेशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सचिन आडेकर यांनी केले.

You may have missed