Pune Pimpri Crime News | कौटुंबिक वादातून आंळदीत दुहेरी हत्याकांड; गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने आळंदीतील हत्याकांडातील फरारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुणे : Pune Pimpri Crime News | ज्येष्ठ महिला व ६ वर्षाच्या निष्पाप जीवांची हत्या करुन पळून गेलेल्या नराधमाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने मुसक्या आवळल्या. आळंदी येथील दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
विनायक तुकाराम भवारी Vinayak Tukaram Bhawari (वय ३१, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर, मुळ रा. तेजुर ता. जुन्नर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याने धनश्री सोनु केदारी (वय ६) आणि मंगल चंद्रकांत शिंदे (वय ७०, रा. हनुमानवाडी, ठाकरवस्ती, केळगाव, आळंदी) यांचा निर्घुण खुन केला होता. ही घटना २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली होती. याबाबत संगीता दत्तात्रय केदारी (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. धनश्री केदारी ही त्यांची नात असून त्यांच्या मुलाची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता केदारी ऊर्फ भवारी या इंद्रायणी हॉस्पिटल येथे रात्रीपाळीस साफसफाईचे काम करत असतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी विनायक भवारी याच्याबरोबर दुसरे लग्न केले होते. विनायक भवारी हा सेंटरिंगचे काम करत असून त्याचेही दुसरे लग्न झाले आहे. तो मधून अधून आळंदीला येऊन संगीता केदारी यांच्या बरोबर रहात होता. त्यांच्याशी भांडण करत असे. काही दिवसांपूर्वी तो संगीता केदारी यांच्याकडे आला होता. तेव्हा त्यांनी तु काय करणार हे नेमके ठरव. मला लिहून आणून दे, तरच मी तुला घरात घेते, असे सांगितले होते. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती.
संगीता केदारी या १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता रात्रपाळीला गेल्या होत्या. त्या रात्रपाळीला जाताना नात धनश्री हिला शेजारील मंगल मावशीकडे सोडत असे. त्याप्रमाणे मंगल मावशीकडे सोडून त्या कामाला गेल्या. दुसर्या दिवशी सकाळी १० वाजता परत आल्यावर घरामध्ये त्यांची नात धनश्री व मंगल मावशी यांच्या डोक्यात मारहाण करुन त्यांचा खुन केला होता. त्यांनी विनायक भवारी याच्यावर संशय व्यक्त केला होता.
आळंदी पोलिसांसह गुन्हे शाखेची सर्व पथके विनायक भवारी याचा शोध घेत होती. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विनायक भवारी हा आळेफाटा परिसरात आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथक आळेफाटा येथे रवाना झाले. पुणे -नाशिक रोडवरील आळेफाटा येथील हॉटेल समाधानजवळ पोलिसांनी विनायक भवारी याला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
संगीता केदारी यांना समजावण्यासाठी आला होता. संगीता केदारी घरी नव्हत्या. मंगल शिंदे याने त्यांच्याशी वाद घातला. तेव्हा रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात मारून त्यांचा खुन केला. त्यावेळी धनश्री ही मध्ये आल्याने व ती इतरांना सांगेल म्हणून तिचा गळा दाबून तिचा खुन केल्याची विनायक भवारी याने कबुली दिली. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनिल जावळे, पोलीस अंमलदार सोनवणे, बोर्हाडे, भोसुरे, सूर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरात, वराडे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेकडील प्रकाश ननावरे यांनी केली आहे.
