Pune PMC News | लोहगाव येथील नियोजित भारत मंडपम साठी आरक्षण उठविण्यासाठीचा सुनावणी अहवाल शासनाकडे पाठविण्यास शहर सुधारणा समितीची मंजुरी

Pune PMC News

पुणे : Pune PMC News |  केंद्र शासनाच्या धर्तीवर लोहगाव येथील स.नं. २३६ व २३८ मधील सुमारे १९.७३ हेक्टर जागेवर भारत मंडपम् उभारण्यासाठी विकास आराखड्यात असलेली पार्किंग, रस्ते, पाण्याची टाकी, हॉस्पीटल, उद्यान, मैदान, भाजी मार्केट ही आरक्षणे उठविण्यासाठीच्या हरकती व सूचनांवरील सुनावणीचा अहवाल शासनाला पाठविण्याचा प्रस्ताव आज शहर सुधारणा समिती अध्यक्षा स्मिता वस्ते यांच्या नेतृत्वाखालील बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला.

लोहगाव येथील वरिल जागेवर नवी दिल्लीच्या धर्तीवर सांस्कृतिक चळवळ, संगीत कला केंद्र, संगीत मैफील केंद्र , व्यापारी मेळावे, आंतरराष्ट्रीय  स्वरूपाचे उपक्रम राबविण्यासाठी भव्य भारत मंडप उभारण्या करिता या जागेवरील आरक्षणे उठवावीत असा अर्ज एमब्लम रियल्टी एलएलपी तसेच आमदार सुनील कांबळे यांनी राज्य शासनाकडे केला होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने आरक्षण वगळणे व बदलण्याकरीत महापालिका अधिनियम ३७ (१) नुसार कार्यवाही सुरू केली.

यासाठी आरक्षण बदलावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या. यावर १३ जणांच्या हरकती आल्या. यापैकी सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांच्यासह १३ जण हे हरकतींवरील सुनावणीसाठी उपस्थित राहीले.  त्यांनी नागरी उपयोगी आरक्षणे बदलण्यासाठी स्थानीक नागरिकांकडून मागणी करण्यात आलेली नाही. नागरी सुविधांची गरज लक्षात घेउन आरक्षणे बदलू नयेत तसेच आरक्षण बदलाबाबतची सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आक्षेप नोंदविला.

महापालिका प्रशासनाने हरकती व सूचनांवरील सुनावणीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनास सादर करण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. शहर सुधारणा समिती अध्यक्षा स्मिता वस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तो मंजूर करण्यात आला.  

दरम्यान, आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव देणार्‍या एमब्लम रियल्टी एलएलपी (लिमेटेड लायबलिटी पार्टनरशीप फर्म) ही १ डिसेंबर २०२३ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे.  आदीत्य राजन जाधव, अशोक धनराज चोरडिया, अतुल चोरडिया, प्रमोद भागचंद रांका, अंकीत उज्वलकुमार पगारीया, श्रेयस उल्हास पगारीया आणि  नील उमेश पगारीया हे या कंपनीचे पार्टनर असल्याचे कंपनीच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.

You may have missed