Pune PMC News | शहरात यापुढे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच बांधकाम सुरू राहाणार ! अनधिकृत बांधकामांच्या पाडकामांचा खर्च वसुलीसाठी महापालिका विशेष प्रयत्न करणार

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | बांधकामांपासून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना बंधनकारक करण्यासोबतच अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. आता यापुढे जावून रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या बांधकामांवरही बंधने आणण्यात येणार असून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच बांधकाम सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर तो काढून टाकण्याचा खर्च संबधितांकडून वसुल करण्यासाठी  विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

शहरातील अनधिकृत बांधकामे, बांधकामांमुळे होणारे वायू प्रदूषणाचे मुद्दे सध्या ऐरणीवर आले आहेत.  बांधकामांच्या ठिकाणी होणार्‍या प्रदूषणामुळे पुणे हे देशातील  प्रदूषित शहरांमध्ये गणले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली असून बांधकामांसाठी नियमावली तयार केली आहे. बांधकामांच्या ठिकाणी टीन शेडस् उभारणे, हिरवे कापड लावणे, बांधकाम पाडताना त्यावर पाण्याची फवारणी करणे, पाच हजार चौ.फुटांवरील बांधकामांच्या ठिकाणी धुलीकणांचे प्रदुषण मोजण्यासाठी सेन्सर बसविणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे या नियमावलीवर प्रशासनाने सध्या भर दिला आहे. एवढेच नव्हे तर  आदेशाचे उल्लंघन करणार्‍या बांधकामांना स्थगिती देखिल देण्यात येत आहे.

यासोबतच बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी अगदी वॉर्डस्तरीय कनिष्ठ अभियंत्यांपासून बांधकाम विभागाचे बांधकाम निरीक्षक आणि उपअभीयंत्यांवर त्यांच्या हद्दीतील बांधकाम साईटसचे सर्वेक्षण करून अहवाल देणे व वरिष्ठ स्तरावर पुढील कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थायी समितीने यानंतरही बेकायदा बांधकामे आढळली तर संबधित अभियंत्यांना जबाबदार धरण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी सध्या पाच हजार चौ.फुटांपर्यंतच्या बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर बसविण्याचे बंधन हे लवकरच एक हजार चौ.फुटांच्या बांधकामांनाही लागू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  कनिष्ठ अभियंता तसेच उपअभियंत्यांना दररोज माहिती भरण्यासाठी स्प्रेडशीट तयार करण्यात येणार आहे. तसेच ऍपही तयार करण्यात येणार आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर मॉनेटरींग करण्यात येईल.  तसेच शहरात रात्री उशिरापर्यंत बांधकामे सुरू राहात असल्याने त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच बांधकाम सुरू ठेवण्याचे बंधन घालण्यात येणार आहे.

अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्याचा खर्च वसुल करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येईल – पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त

अनधिकृत बांधकाम पाडण्याचा  खर्च संबधित मिळकत धारकाकडून घेण्यात यावा, अशी कायद्यात तरतूद आहे. परंतू बांधकाम विभागाच्यावतीने यासाठी पाठपुरावा करण्यात येत नाही. निवासी बांधकामांच्या ठिकाणी बांधकामच पाडून टाकल्याने अगोदरच नुकसान झाल्याने या मंडळींकडून पाडकामाची रक्कम वसुल होत नाही. परंतू अनेक व्यावसायीक आस्थापना फ्रंट आणि साईड मार्जीनमध्ये बांधकाम करतात. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांच्या मूळ जागेत व्यवसाय सुरू असतो. तसेच अनेकदा ही मंडळी नव्याने अनधिकृत बांधकाम करतात. यावर उपाययोजना म्हणून संबधितांकडून पाडकामाचा खर्च वसुल करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येईल. – पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त.

कोथरूड  आणि डेक्कन परिसरात मोठ्याप्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी रात्री दहा वाजल्यानंतरही काम सुरू असल्याने मोठ्याप्रमाणावर ध्वनी व वायू प्रदूषण होत असते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली बांधकामे थांबवावीत, अशा तक्रारी ज्येष्ठ आणि आजारी नागरीकांकडून येत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली बांधकामांवर बंधने घालावीत, अशी मागणी नगरसेवक पुनीत जोशी आणि बापू मानकर यांनी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे केली आहे.

You may have missed