Pune PMC News | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पदपथ दुरूस्ती मोहीमेला फासला हरताळ
सॅलसबरी पार्क येथील इरावती कर्वे ते यशवंतराव भिमाले गार्डन दरम्यानच्या पदपथावर 49 लाख रुपये खर्चून पुन्हा नव्याने डेकोरेटीव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्स बसविण्याची निविदा मंजूर
पुणे : Pune PMC News | शहरातील सर्वच पदपथ एकसारख्या उंचीचे आणि एक सारख्या रंगसंगतीची विशेष मोहीम हाती घेणार्या आयुक्तांनी स्वत:च्याच मोहिमेला हरताळ फासला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभाग क्र. २८ सॅलसबरी पार्क येथील इरावती कर्वे ते यशवंतराव भिमाले गार्डन या अंतर्गत रस्त्यावरील पदपथाला डेकोरेटीव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्सची (एलईडी लाईटस्) दुरूस्ती व नव्याने ब्लॉक्स बसविण्याची तब्बल ४८ लाख ९८ हजार रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निविदेला मंजुरी देण्यात आली.
यापुर्वी या रस्त्यावर या प्रभागातून पुर्वीही नगरसेवक आणि सभागृह नेता राहीलेले विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याच काळात पदपथाला रात्रीच्यावेळी प्रकाशमान होणारे डेकोरेटीव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्स बसविण्यात आले होते. हा रस्ता गोळीबार मैदान येथून वखार महामंडळाकडे जाणारा अवघा बारा मिटरचा अंतर्गत रस्ता आहे. हे ब्लॉक्स महागडे असल्याने त्याचा मेन्टेनन्सचा खर्च अधिक असल्याने शहरात केवळ विमानतळ येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसविण्यात आले आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाने महापालिका निवडणुकीपुर्वी डिसेंबरमध्ये पुन्हा इरावती कर्वे ते यशवंतराव भिमाले गार्डन दरम्यानच्या रस्त्यावर पुन्हा डेकोरेटीव्ह कर्विंग ब्लॉक्स बसविण्याची निविदा ४ डिसेंबरला काढली. निविदेचा कालावधी अगदी आठच दिवसांचा ठेवून एकाच वर्तमान पत्रात निविदा जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. १२ डिसेंबरला ही निविदा उघडण्यात आली.
या कामासाठी दोन निविदा आल्या होत्या. त्यापैकी शांती इलेक्ट्रीकल्सची निविदा पॉईंट १९ एवढी कमी होती तर फ्लॅश एन्टरप्राईजेसची निविदा १.१ टक्के अधिक होती. प्रशासनाने तडजोड केल्यानंतर शांती इलेक्ट्रीकल्सने दोन टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली. प्रशासनाने आज ऐनवेळी बैठकीपुढे ही निविदा मान्यतेसाठी ठेवली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या निविदेला मान्यता देण्यात आली.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी नुकतेच शहरातील पदपथ एकाच उंचीचे, एकाच रंगाच्या ब्लॉक्समध्ये करण्याची मोहीम जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात गर्दीच्या ठिकाणी अधिकचा वापर असलेल्या पदपथांचे या पदतीने काम करण्याचे जाहीर करून मॉडेल कॉलनी येथून या कामाची सुरूवात देखिल केली. असे असताना एकाच अंतर्गत रस्त्यावर पुन्हा डेकोरेटीव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्स बसविण्याची निविदा प्रक्रिया राबविली. विशेष असे की स्वत: पदपथांबाबतची घोषणा केल्यानंतर गर्दी नसलेल्या रस्त्यावरील पदपथांवर डेकोरेटीव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्स बसविण्याची निविदा मान्यतेसाठी ठेवत स्वत:च्याच मोहीमेला हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेवक असताना माझ्या प्रभागातील वरील रस्त्यावरील पदपथावर २०१८ मध्ये डेकोरेटीव्ह कर्विंग ब्लॉक्स बसविले हेाते. रात्रीच्यावेळी वाहन चालकांना ते दिशादर्शक तसेच आकर्षक ठरत होते. आठ वर्षांमध्ये ते खराब झाल्याने नागरिकांकडून हे ब्लॉक्स पुन्हा बसविण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी निविदा प्रक्रिया राबविली. आज स्थायी समितीमध्ये या निविदेला मान्यता देण्यात आली.
श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष
