Pune PMC News | ‘वृक्ष गणने’ची ३० कोटींची संशयास्पद निविदा स्थगित करण्याचे स्थायी समितीचे आदेश; स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
पुणे : Pune PMC News | महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली वृक्ष गणनेच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. यापुर्वीची वृक्ष गणना साधारण वर्षभरापुर्वीच ज्या कंपनीने पूर्ण केली पुन्हा त्याच कंपनीला नव्याने काम देण्यात आले आहे. या कंपनीने महपाालिकेच्या मिळकत कर विभागाचे काम चुकीच्या पद्धतीने केले असल्याने तिचे बिल थांबविले असताना पुन्हा त्याच कंपनीला काम देण्यावरून स्थायी समितीमध्ये सदस्यांनी चिरफाड केली. प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून ही निविदा स्थगित ठेवावी, असे आदेश प्रशासनाला दिले, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पार्श्वभूमी अशी की, मागील महिन्यांत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शहर व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील वृक्ष गणना करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे काम सार आयटी प्रा.लि. या कंपनीला मिळाले असून यासाठी २९ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे. प्रशासनाने शहर व समाविष्ट गावांत मिळून एक कोटी १० लाख वृक्ष असल्याचे गृहीत धरुन प्रत्येक वृक्षाची जीआयएस व जिओ टॅगींगद्वारे गणना करण्याचे उद्दीष्ट ठेवले. प्रत्यक्षात २०१६ मध्ये महापालिकेने जुन्या हद्दीतील वृक्षगणना केली आहे. ही गणना २०२४ मध्ये संपली असून शहरात ५८ लाख झाडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना मागील डिसेंबरमध्ये प्रशासनाने पुन्हा निविदा काढली.
या निविदेच्या प्रस्तावात अटीशर्तींमध्येही काहीअंशी बदल करून ठराविक ठेकेदारच यासाठी पात्र ठरेल याकडे विशेष लक्ष देण्यात आले. या प्रस्तावामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आल्या.. हे काम ज्या कंपनीला मिळाले, त्या कंपनीकडे यापुर्वी मिळकत कर विभागाने मिळकतींच्या जीओ टॅगींगचे काम सोपविले होते. या कंपनीने या कामांत घोळ घातल्याने अर्ध्यावरच काम थांबविण्यात आले. याच कारणास्तव कंपनीचे निम्म्याहून अधिक बिल तसेच डिपॉझीटही महापालिकेने दिलेले नाही. कंपनीची पार्श्वभूमीवर न तपासाताच ऐनवेळी प्रशासनाच्यावतीने स्थायी समितीमध्ये प्रस्ताव आणून महापालिका आयुक्तांकडून तो मान्यही करून घेतल्याने मोठ्याप्रमाणावर टीकेची झोड उडाली होती.
दरम्यान, सदस्यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव रद्द करण्याबाबत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. जुन्या हद्दीतील वृक्ष गणनेत ५८ लाख वृक्षांची मोजणी झालेली असताना पुन्हा समाविष्ट गावांसह १ कोटी १० लाख वृक्षांचा आकडा कोठून आला. पुर्वी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आता पुन्हा नव्याने २९ कोटी ८३ लाख रुपये खर्च करण्यास विरोध दर्शवत संबधित कंपनीबद्दलही प्रश्न उपस्थित केले. महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमांतून वृक्ष गणना करता येईल का याची चाचपणी करून वृक्ष गणनेबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तोपर्यंत वृक्ष गणनेची निविदा स्थगित ठेवावी, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
