Pune Police News | दीड वर्षांपासून फरार असलेल्या संतोष भंडारीच्या छत्रपती मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीविरोधात ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : Pune Police News | मुदत ठेवीवर ११ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवुन १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या छत्रपती मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी, गेवराईचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी (रा. मिलेनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह साथीदारांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत डॉ. विजेंद्र उत्तमराव पाटील (वय ३७, रा. केशवनगर, मुंढवा) यांच्या फिर्यादीवरुन हडपसर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पाटील व इतर ३० जणांची १ कोटी १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी संतोष भंडारी याच्यासह प्रतिनिधी विरुद्ध ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भंडारी याच्याविरुद्ध बीड, गेवराई तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होत असल्याचे समजल्यावर तो गेल्या दीड वर्षांपासून फरार आहे.
पुण्यातील गुन्ह्यामध्ये आतापर्यंत १२० ठेवीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्यात फसवणूक झालेली रक्कम ३ कोटी ४ लाख रुपये आहे. हा गुन्हा गेल्या महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणातील ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी केले आहे.
