Pune Swargate Bus Depot Assault Case | स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण: एक वर्ष पूर्ण; आरोपी दत्ता गाडेचा न्यायालयात निर्दोषत्वाचा दावा
पुणे : Pune Swargate Bus Depot Assault Case | शहरातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी २०२५ रोजी घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडेने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा अर्ज केला आहे. आरोपीने यासोबतच जामीन मिळवण्याची याचिकाही सादर केली असून, अद्याप न्यायालयाने या अर्जांवर अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तपास करत ८९२ पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. घटनास्थळी आरोपीचा सेल फोन इतिहास, सीसीटीव्ही फुटेज, शर्टाचे बटण यांसह इतर महत्त्वाचे पुरावे सादर केले गेले आहेत.
पीडितेच्या वकिलांनी आणि पोलिसांनी गाडे यांच्या जामीन अर्जाचा विरोध केला आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच आरोपीविरुद्ध आरोप निश्चिती व सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती विशेष सरकारी वकीलांनी दिली आहे.
प्रकरण काय आहे?
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे पावणेसहा ते पावणे सातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
