Pune Police MPDA Action | गावठी दारु विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई, नाशिक कारागृहात एक वर्षासाठी केले स्थानबद्ध

crime

पुणे : Pune Police MPDA Action | पाषाण येथील लमाण तांडा व परिसरात बेकायदा गावठी दारु तयार करुन विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

थावरिया वाल्या पातलावत (वय ५३, रा. लमाण तांडा, पाषाण, असे कारवाई करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. पातलावत हा पाषाण परिसरात गावठी दारु तयार करुन विक्री करत होता. गावठी दारुच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे विकार, तसेच जिवीतहानी सारखे प्रकार घडण्याची शक्यता होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी पातलावत याच्याविरुद्ध कारवाई केली होती. गावठी दारु विक्री प्रकरणी त्याच्याविरुद्ध यापूर्वी सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले होते. त्यानंतरही तो गावठी दारु तयार करून विक्री करत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मर्गदर्शनाखाली आरोपाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये ((एमपीडीए) प्रस्ताव तयार करण्यात आला. संबंधित प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची पडताळणी करुन त्याला नाशिक कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले.

ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक किरण पाटील यांच्यासह पथकाने केली.

You may have missed