Pune Crime News | खिडकी समजून विमान हवेत असताना प्रवाशाने  केला आपातकालीन दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न, प्रवाशांच्या जिवितास धोका पोहचविण्याचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Thinking it was a window, a passenger tried to open the emergency door while the plane was in the air, a case filed against the person for endangering passengers' lives

पुणे : Pune Crime News |  दिल्ली वरुन पुण्यात येत असलेल्या इंडिगोचे विमान हवेत होते़, त्याचवेळी अचानक सेन्सर वाजण्यास सुरुवात झाली. सर्व प्रवासी घाबरुन गेले. सेन्सर का वाजायला लागले हे तपासले असता १९ ब सीटवर बसलेला प्रवासी  विमानातील आपातकालीन दरवाजा उघडण्याकरीता असलेल्या लिव्हर वरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या जिवितास धोका पोहचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.

गौरव सत्येंद्र रौतेला Gaurav Satyendra Rautela (वय ३३, रा. आनंद पार्क, तारादत्त पूर्व सोसायटी, सासवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो कंपनीचे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८, रा. हिंजवडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना दिल्ली ते पुणे विमानात २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पाऊण वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रौतेला हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते इंडिगोच्या विमानातून दिल्लीहून पुण्यात येत होते. विमानाने दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळातच विमानातील सेन्सर वाजू लागले. या आवाजाने विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानातील वैमानिक व इतर अटेंडट यांनी तपासणी केली. तेव्हा १९ ब सीटवरील प्रवाशाने विमानातील आपातकालीन दरवाजा उघडण्याकरीता त्याच्यावर असलेले लिव्हर वरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यामुळे विमानातील लोकांनी त्याला रोखले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने त्याला ही खिडकी असावी, असे समजून ती उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मध्यरात्री पाऊण वाजता विमान हवेत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर साधारण अडीच वाजता विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर गौरव रौतेला याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकाराने विमानात एकच घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे इंडिगोच्या सुरक्षा विभागाने तक्रार दिली आहे. फ्लाईटमधील इतर प्रवासींचे जिवित व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कृती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानतळ पोलिसांनी गौरव रौतेला याला नोटीस दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करीत आहेत.

You may have missed