BMC Mayor | मुंबई महापौरपदी भाजपकडून रितू तावडे; उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड
मुंबई : – BMC Mayor | मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांना उमेदवारी देत महायुतीने मुंबईतील सत्तेची समीकरणे स्पष्ट केली आहेत. या निर्णयामुळे महापालिकेत भाजप-शिंदे गट युतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावावर पक्षांतर्गत सहमती झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. संघटनात्मक कामाचा अनुभव आणि पक्षातील सक्रिय भूमिका लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची निवड करत महायुतीने सत्तेतील संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीनंतर कोणाची सत्ता येणार याबाबत मोठी उत्सुकता होती. शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. अखेरीस महायुतीने एकत्रितपणे सत्ता स्थापनेचा निर्णय घेत उमेदवार जाहीर केले. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडीमुळे आगामी काळात प्रशासनिक निर्णयांवर महायुतीची छाप राहणार आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नवी दिशा देण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घोषणेनंतर मुंबई महानगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून लवकरच महापौर-उपमहापौर निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.
कोण आहेत रितू तावडे?
– रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.
- 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
– 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.
– यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
– त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.
– त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
