Shirur Pune Accident News | पुणे : अष्टविनायक महामार्गावर मलठण येथे भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू
पुणे / शिरूर : Shirur Pune Accident News | अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातील मलठण येथे घडली. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले.
या अपघातात अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरेवस्ती, ता. शिरूर) या दोन तरुणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मलठण येथून कवठे येमाईच्या दिशेने जात होती. यावेळी कारचालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मदत न करताच चालकाचे पलायन
अपघातानंतर कारचालकाने जखमी तरुणांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली नाही. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती न देता कार घटनास्थळी सोडून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सुरेश मारुती चोरे (वय ४७, रा. डोंगरगण, चोरेवस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
