Pune Crime News | तुम्ही मागितले नसताना क्रेडिट कार्ड आले का? मागणी केली नसताना क्रेडिट कार्ड पाठवून ते अॅक्टिव्हेट करायला सांगून महिलेची फसवणूक करणार्या कोटक बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शिवणकाम करणार्या महिलेने मागितले नसताना तिला क्रेडिट कार्ड पाठविले. ते अॅक्टिव्हेट करायला सांगून सायबर चोरट्यांनी क्रेडिट कार्डवरील रक्कम काढून घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी कोटक बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवण काम करतात. त्यांचे टेलरचे लक्ष्मी रोडला दुकान आहे. कोटक बँकेत त्यांचे बचत खाते आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना कोटक बँकेचे मॅनेजर बोलत असल्याचे सांगणारा एक फोन आला. तुमचे सिबील चांगले असल्याने आम्ही तुम्हाला ७७ हजार रुपयांचे क्रेडिट कार्ड ऑफर करत आहोत, असे सांगितले. त्यावर त्यांनी मला क्रेडिट कार्ड नको, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरच्या पत्त्यावर नवीन क्रेडिट कार्ड आले. त्यांनी ते न उघडताच तसेच ठेवून दिले. त्यानंतर काही वेळाने कोटक बँकेचे मॅनेजर बोलत असल्याचा फोन आला. त्यांनी मला क्रेडिट कार्ड नको असताना देखील तुम्ही मला क्रेडिट कार्ड कसे काय पाठविले, याबाबत विचारणा केली.
त्यांनी आता क्रेडिट कार्ड आले आहे तर असु द्या. त्यावर खूप ऑफर चालू असल्याचे सांगितले. त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याने क्रेडिट कार्डसाठी पिन जनरेट करण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पिन जनरेट केला. त्यानंतर त्यांनी क्रेडिट कार्डवरील बॅलेन्स चेक केला असता त्यावर २९५ रुपये होते. त्यांनी त्या कोटक बँकेचे मॅनेजर म्हणून फोन करणार्याला कॉल केल्यावर त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी कोटक बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करीत आहेत.
