Pune Crime News | रवी तागुंदे-आसिफ अन्सारीच्या भांडणात पडु नको़, तुला जिवंत ठेवणार नाही; इस्टेट एजंटला धमकावुन मारहाण करुन केले जखमी, वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | रवी तागुंदे आणि आसिफ अन्सारी यांच्या वादात पडला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन एका इस्टेट एजंटला तिघांनी कंबरेच्या पट्ट्याने, हाताने पायावर, दंडावर बेदम मारहाण करुन जखमी केले. वारजे माळवाडी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
अमीर हबीब चौधरी (वय ४७, रा. ओम प्रांगण, आंबेगाव बुद्रुक) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल अशोक सोनवणे Vishal Ashok Sonawane (वय २९, रा. सहयोगनगर, वारजे माळवाडी), मंदार मनोज जोशी Mandar Manoj Joshi (वय ३३, रा. ओंकार कॉलनी, वारजे माळवाडी) आणि अजय रामलाल बनपट्टे Ajay Ramlal Banpatte (वय २३, रा. सहयोगनगर, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना वारजे माळवाडी येथील ओंकार कॉलनीतील रवी तागुंदे यांच्या घरासमोर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सोनवणे, मंदार जोशी आणि अजय बनपट्टे यांच्यावर यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी अमीर चौधरी हे रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. रवी तागुंदे हे बिल्डर आहेत़ त्यांच्यावर यापूर्वी डुक्कर खिंडीमध्ये जून २०२१ मध्ये गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी चौघांना अटक केली होती.
रवी तागुंदे आणि असिफ अन्सारी यांच्यामध्ये एका व्यवहारावरुन वाद आहे. दोन महिन्यांपूर्वी अमीर चौधरी यांनी दोघांच्या व्यवहाराबाबत मध्यस्थी केली. तेव्हापासून त्यांच्या चौधरी यांच्यावर राग आहे.
अमीर चौधरी हे दर शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी सुरभी कॉलनी या ठिकाणी नमाज पठाण करण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता ते ओंकार कॉलनी येथील मस्जिद येथे नमाज पठण करण्यासाठी त्यांनी माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील पुलाखाली कार लावली. तेथून मोबाईलवर बोलत ते पायी मस्जिदकडे जात होते. त्यावेळी रवी तागुंदे यांच्या घरासमोर आले असताना पाठीमागून विशाल सोनवणे आला. त्याने लोखंडी पाईपाने मारण्यास सुरुवात केली.
त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता समोरुन मंदार जोशी याने चप्पलने व हातान मारहाण करण्यास सुरुवात केली. विशाल सोनवणे याने ‘‘तू रवी तागुंदेच्या नादी लागू नको, मी दोन मर्डर केले आहेत. तू असिफ अन्सारी व रवी तागुंदेच्या मॅटरमध्ये पडलास तर तुला जिवंत ठेवणार नाही़’’अशी धमकी दिली. अजय बनपट्टे याने कंबरेचा पट्टा काढून त्या पट्टयाने चौधरी यांना मारहाण केली. जखमी झालेल्या चौधरी यांनी ससून रुग्णालयात उपचार घेऊन वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़ पोलीस उपनिरीक्षक विनायक कापसे तपास करीत आहेत.
