Pune Crime News | बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवरील आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईत 4 अल्पवयीन मुलींसह 2 बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बुधवार पेठेतील कुंटणखात्यात बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याच्या माहितीवरुन शहर पोलीस दलाने आजवरची सर्वात मोठी कारवाई कुंटणखान्यांवर केली. त्यात ४ अल्पवयीन मुलींसह दोन बांगलादेशी महिला आढळल्या असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या मुलींना वेश्या व्यवसायाला लावणार्‍या त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DUm_IgyCfUP

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेसह इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाच्या मदतीने येथील तब्बल ३९ कुंटणखान्यांची पोलिसांनी कसून तपासणी केली. या प्रकरणी एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावेळी वेश्यागमनासाठी आलेल्या २०० ते ३०० जणांना पोलिसांनी पहाटेपर्यंत रस्त्यावर बसवुन ठेवले होते. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास लावणारे त्यांचे आई वडिल व घरमालकाचा मुलगा अशोक उमाकांत माने (रा. चंदननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यातील दोन अल्पवयीन मुलींचे आईवडिल जोगत्याचा व्यवसाय करतात. दो बदन या इमारतीत ते वेश्या व्यवसाय चालवतात. एका मुलीची आई येथील कापड दुकानात काम करते. दुसर्‍या मुलीचे आईवडिल हयात नसल्याने तिचा एक महिला सांभाळ करत आहे.

बुधवार पेठेतील माचीस बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये चार महिला आढळून आल्या. त्यातील ३ महिला या पश्चिम बंगालमधील आहेत. तर एक महिला बांगला देशातील असल्याचे आढळून आले. सिमला हासिम सरदार खातुन (वय २६) हिच्याकडे चौकशी केल्यावर तिला राजन नावाच्या दलालाने बांगला देशातील ढाक्यावरुन कोलकत्ता येथे काम मिळवुन देण्याच्या बहाण्याने आणले. त्यानंतर राजन याने तिला मुल्ला नावाच्या दलालाकडे सोपविले. मुल्ला याने तुला पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवुन देतो, असे सांगून रेल्वेने पुण्यात आणले़ रेड लाईट एरियामधील ताजमहल बिल्डिंग येथील शांताबाई या महिलेकडे वेश्या व्यवसायाकरीता सोपविले.

शांताबाई हिने पैशाचे प्रलोभन दाखवून तसेच धाकदपटशा दाखवुन तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेतला. शांताबाईकडे ३ महिने काम केल्यानंतर तिला यातून बाहेर पडुन मुळ देशात परत जायचे होते. तिने तिच्या ओळखीचा दलाल जोहरुद्दीने शेख याच्याकडे मदत मागितली. जोहरुद्दीन याने तुला बांगला देशात परत पाठविण्यासाठी मोठी रक्कम लागेल. तु शांताबाईकडून निघुन ये आणि रेश्मा कडे काही महिने वेश्या व्यवसायाचे काम कर, तुझे पैसे जमा होताच मी तुला तुझ्या देशात परत पाठवितो, असे खोटे आश्वासन दिले. तिला माचिस बिल्डिंगमधील मालकीन रेश्मा हिच्याकडे वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले.

सपना बिल्डिंगमध्ये एक महिला आढळून आली. शिल्पी अब्दुर शेख मुन्शी (वय ५५) ही बांगलादेशी असल्याचे आढळून आले. भारतात चांगले काम मिळवुन देतो, असे सांगून तिला एका दलालाने कोलकत्ता व तेथून रेल्वेने पुण्यात आणून सपना बिल्डिंगमधील रणजित या दलालाकडे सोपविले. रणजित या दलालाने तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत होता. अर्धी रक्कम तिला देत होता.

याबरोबरच रामेश्वर बिभिषण बिराजदार (वय ३१, रा. गणराज हॉटेलचे पार्किंग मधील रुम, बाजीराव रोड, मुळ रा. तांबरवडी, ता. औसा, जि. लातुर) याच्याकडे ३ हजार ५०० रुपयांचा ७ ग्रॅम चरस आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई १० फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा ते ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करुन करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, शैलेश संखे, शंकर खटके, अजय परमार, राहुल आवारे, संगिता अल्फानसो शिंदे, सुनिल जैतापूरकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील १९ पोलीस निरीक्षक, ५५ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि ३७५ पोलीस अंमलदार या कारवाईत सहभागी झाले होते.

You may have missed