Pune Crime News | गोल्ड व्हॅल्युएटरने संगनमत करुन खोटे सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल देऊन 41 जणांना सोने तारण देण्यास सांगून कल्याण जनता सहकारी बँकेला घातला कोट्यवधीचा गंडा, गोल्ड व्हॅल्युएटर झाला फरार
पुणे : Pune Crime News | कल्याण जनता सहकारी बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युएटरने संगनमत करुन ४४ जणांना सोने तारणासाठी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल दिला. बँकेने सोने तारणावर कर्ज दिल्यानंतर कर्जदार आणि गोल्ड व्हॅल्युएटर असे दोघेही फरार झाले असून कल्याण जनता सहकारी बँकेला तब्बल १ कोटी १६ लाख ५६ हजार २१७ रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
कल्याण जनता सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक निलेश दत्तात्रय देशमुख (वय ५०, रा. अॅमनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युएटर अजित प्रभाकर कुलकर्णी मे. मोतीवाले लक्ष्मण गणेश कुलकर्णी सांगलीकर सराफ जव्हेरी यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कल्याण जनता सहकारी बँकेच्या वारजे शाखा व बिबवेवाडी शाखा येथे २६ ऑक्टोंबर २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जनता सहकारी बँकेने सोने तारण कर्ज देण्याअगोदर सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासणे व त्याचे वजन व मुल्य तपासणी करुन त्यावर अहवाल देण्यासाठी बँकेकडून मुल्यांकनकार या पदावर अजित कुलकर्णी यांची ३१ मार्च २०१८ पासून नेमणूक केली होती. त्यांच्या पदाचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आले आहे.
२१ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत २२ ग्राहकांना सोने तारण कर्ज देण्यात आले. मनोज निलप्पा चलवादी, महेश निलप्पा चलवादी, निल्लप्पा बसप्पा चलवादी (सर्व रा. लकी बाजार, केशवनगर, मुंढवा), राजश्री राजेंद्र लडकत (रा. भवानी पेठ), अजय अमरनाथ करोसीया, जयश्री निल्लपा चलवादी (रा. केशवनगर, मुंढवा), मधु नागेश चलवादी (रा. श्रीनिवास सोसायटी, वडगाव बुद्रुक), नागेश बसप्पा चलवादी (रा. श्रीनिवास सोसायटी, वडगाव बुद्रुक), मेघना गौतम सुपेकर, गौतम दिलीप सुपेकर (दोघे रा. श्रीनिवास सोसायटी, वडगाव बुद्रुक), सौरभ भारत थोरात, सई सौरभ थोरात (रा. थोरात बिल्डिंग, कात्रज), पोर्णिमा अक्षय तिडके ( रा. सागरुळ, पिरंगुट, मुळशी), रुपेश रमेश सुर्वे (रा. शुक्रवार पेठ, सोमणवाडा), अर्चिता राजेश जागडे (रा. शिवजनाई निवास, वडगाव बुद्रुक),
गौरव जगन्नाथ आढाव (रा. शिवणे), पुनम संदिप येलकर, संदीप शांताराम येलकर (दोघे रा. साई निवास पिरबाबा रोड), सुनिल रघुनाथ कदम (रा. उत्तमनगर), पल्लवी ज्ञानोबा कदम (रा. लोणी काळभोर), प्रणव शौल खंडारे (रा. लोणी काळभोर), वैजंयती सुनिल कदम (रा. उत्तमनगर) या कर्जदारांनी सोन्याची पोत, हार, पदक हार, बांगड्या, कडा, चैन, अंगठी व इतर दागिने आणले. अजित कुलकर्णी यांनी या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासून त्या दागिन्यांचे मुल्यांकन प्रमाणपत्र बँकेस सादर केले. या प्रमाणपत्रावरुन बँकेने सर्व २२ कर्जदारांना एकूण ४४ लाख रुपयांचे सोने तारण कर्ज, वार्षिक साडेआठ टक्के व्याज दराने व एक वर्ष परतफेडीच्या अटीवर दिले. त्यातील काही ग्राहकांनी कर्जाच्या परतफेडीसाठी १५ जानेवारी २०२२ पर्यंत १ लाख ४८ हजार ३५० रुपये मुद्दलापोटी आणि व्याजापोटी ३ लाख ६९ हजार ४७३ रुपये बँकेत जमा केले.
त्याचप्रमाणे कल्याण जनता सहकारी बँकेच्या वारजे शाखेने २६ ऑक्टोंबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत २२ कर्जदारांना सोने तारण कर्ज दिले. प्रदिप प्रभाकर गिरांजे, रंजना प्रदिप गिरांजे, प्रियांका प्रभाकर गिरांजे (तिघे रा. सुतारदार, पौड रोड), सरस्वती भीमराव गायकवाड, मिनाक्षी राजेश गायकवाड, दिलीप भिमराव गायकवाड, भिमराव गुरुलिंग गायकवाड (चौघेही रा. वारजे माळवाडी), रामभाऊ सुखदेव कांगणे, रोहिणी रामभाऊ कांगणे (रा. केशवनगर, मुंढवा), रोहन बंडु मानकर (रा. सागरुळ), शुभम दत्तात्रय राऊत, तेजस दत्तात्रय राऊत, किरण सिताराम लोंढे, ऋषिकेश बंडु मानकर, शुभम तानाजी धोत्रे (सर्व रा. सागरुळ), वर्षा राजेंद्र लडकत, महेश राजेंद्र लडकत (दोघे रा. भवानी पेठ), अशुतोष पदमाकर मुळे (रा. विवेकानंद कॉलनी, कोथरुड), अंकुश बळीराम पाठक (रा. सिद्धार्थ हाईटस), सोमनाथ हिरामण आल्हाट, आश्विनी सोमनाथ आल्हाट (रा. मोशी) या कर्जदारांना अजित कुलकर्णी यांनी सोन्याचे दागिने तपासणी करुन अहवाल दिला.
त्यावरुन १७ जणांना प्रत्येकी २ लाख रुपये तिघांना ५ लाख रुपये आणि एकाला ४ लाख ७० हजार रुपये असे ५३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. त्यातील काही ग्राहकांनी २७ डिसेंबर २०२१ पर्यंत मुद्दलापोटी ७ लाख १७ हजार ९४६ रुपये व व्याजापोटी ४ लाख ६० हजार १९८ रुपये बँकेत जमा केले. दिलीप भिमराव गायकवाड व आशुतोष पदमाकर मुळे यांनी ३० नोव्हेबर २०२२ रोजी संपूर्ण कर्ज रक्कम व व्याज भरुन कर्ज खाते बंद केले.
काही महिने कर्जदारांनी नियमित हप्ते भरले. त्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड थांबविली. त्यांना पाठविलेल्या नोटिसाला उत्तर दिले नाही. त्यामुळे बँकेने गोल्ड व्हॅल्युएटर अजित कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते घरी व कार्यालयातही न भेटल्याने ते परागंदा झाल्याचे आढळून आले. बँकेने कर्जदारांना वारंवार नोटिसा पाठविल्यानंतर ही त्यांनी कर्जफेड न केल्याने बँकेने गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे २०२२ मध्ये तक्रार अर्ज केला होता.
बँकेने ४१ कर्ज प्रकरणामध्ये तारण ठेवलेल्या सोन्याचे पूर्नमुल्यांकन व फेर तपासणी करण्याचे ठरविले. ६ ऑगस्ट २०२५ रोजी बिबवेवाडी शाखा आणि ७ ऑगस्ट २०२५ रोजी वारजे शाखा येथे बँकेने नेमणुक केलेल्या गोल्ड व्हॅल्युएटर यांनी सर्व दागिन्यांची पडताळणी केली. त्यांनी तारण ठेवलेले सर्व सोने खोटे असल्याचे सांगितले. तसा बँकेला रिपोर्ट सादर केला. आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर आता वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करीत आहेत.
