Pune Crime News | भोंदुबाबा ऋषिकेश वैद्य याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या; मांजरी पोलिसांनी पिंपरी परिसरात केली अटक
पुणे : Pune Crime News | नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याने महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार करणार्या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले होते. एका महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पसार झाला होता. मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे.
अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील महिलेने हिमंत करुन हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पिडित महिला ही मुळची पुण्यातील आहे. ऑक्टोंबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदु ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली. वैद्य हा मुळचा वसई येथील राहणारा आहे. त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो, असे सांगितले. २०२३ मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची भेट घेतली. तिला त्याने गुंगीचे औषध देऊन मी महादेवाचा अवतार आहे. तु माझी पार्वती असे बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईत बोलावले व तेथेही तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
वसई व पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्य याचा शोध घेत होते. तो पिंपरी परिसरात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.
