Pune Crime News | मैत्रिणीच्या कारणावरुन मित्राला पकडण्यासाठी रुमवरील दोघांना मारहाण करुन अश्लिल कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून 10  दिवस ठेवले डांबुन; तक्रार केली तर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मित्राच्या रुमवर आराम करण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांना चौघांनी मारहाण केली. मैत्रिणीच्या कारणावरुन तो मित्र यावा, म्हणून दोघा मित्रांचे अपहरण करुन त्यांना अश्लिल कृत्य करायला लावले. त्याचे  फोटो काढले. त्यांना लातूरला घेऊन जाऊन पुन्हा पुण्यात आणले. त्यानंतर मारहाणीमुळे आलेली सुज उतरावी म्हणून तब्बल १० दिवस डांबुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुभम पाटील ऊर्फ शुभम हवा, आशिश आंधारे आणि त्यांचे साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना लातूर व चंदननगर येथील एस एल एन पी जी तसेच खराडी येथील झोलो पी जीमध्ये १३ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर दरम्यान घडली आहे. याबाबत वाघोली येथील एका २५ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कारचालक म्हणून अ‍ॅमेझॉन कंपनीचे कर्मचारी यांना आणण्या, नेण्याचे काम करतो. त्याचा एक मित्र हा चंदननगर येथील एस एल एन पी जी सोनाई पार्क येथे राहण्यास आहे. फिर्यादी हा अधून मधून आराम करण्यासाठी त्याच्या रुमवर जात असतो. १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तो या मित्राच्या रुमवर गणवेश बदलण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या मित्राचा एक मित्र रुमवर होता. त्याचा मित्र रुमवर नव्हता. साधारण ७ वाजता शुभम पाटील ऊर्फ शुभम हवा, आशिष अंधारे व त्याचे दोन साथीदार रुमवर आले. त्यांनी समर्थ कोठे आहे, अशी विचारणा केली. शुभम याने फिर्यादी यांच्याकडील कारची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने तीन दुचाकींवर बसवुन खराडी येथील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर नेले. तेथे त्यांनी दोघांना मारहाण केली. कपडे वाळविण्याच्या लोखंडी स्टँडने डोक्यात, पाठीवर मारले.

स्टँड तुटल्याने त्याच्या गजाने मारहाण केली. त्यामुळे दोघांना ठिकठिकाणी सूज आली. त्यातील एकाने शुभम याला यांचे कपडे काढा असे सांगितले. त्यांनी कपडे काढण्यास नकार दिल्यावर त्यांना वायरने करंट दिला. त्यामुळे घाबरुन त्या दोघांनी कपडे काढले. त्यानंतर त्यांना बिअरच्या रिकाम्या बाटलीवर बसायला भाग पाडले. त्यांना नग्नावस्थेत असताना अश्लिल कृत्य करायला लावले. त्याचे मोबाईल मध्ये फोटो काढले. तुम्ही जर पोलिसांना किंवा इतरांना कोणाला याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला, तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना कपडे घालण्यास सांगून पुन्हा दुचाकीवरुन खराडी गावातील स्मशानभुमी येथे घेऊन गेले. तिथे जबरदस्तीने दारु पाजली. त्यांच्यातील एक जण फिर्यादी यांची हुंडाई कार घेऊन आला. शुभम याने कारचे जीपीएस तोडले व त्यानंतर शुभम आशिष व त्यांचा एक साथीदार यांनी दोघांना जबरदस्तीने गाडीत घालून लातूर येथे एका गावात जलपरी हॉटेलजवळील शेतात घेऊन गेले. १४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता ते लातूरला पोहचले. त्यानंतर त्यांना पुन्हा कारमध्ये बसवुन रात्री खराडी येथील झोलो पी जी येथे रुममध्ये आणले. तेथे एक रात्र डांबुन ठेवले होते.

१५ ऑक्टोंबर रोजी शुभम याने फिर्यादी यांच्या कामाचे सुपरवायझरला फोन करुन गाडी खराडी येथे पार्क केली आहे. चावी पुढील टायरवर ठेवल्याचे सांगून ती घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर शुभम याने खराडी येथील एका फ्लॅटवर पुन्हा घेऊन गेले. तेथे गेल्यावर शुभम याने फिर्यादी यांना त्याच्या मित्राला फोन लावण्यास सांगितले. तू कोठे आहेस?, मला घ्यायला ये, असे जबरदस्तीने बोलायला लावले. त्यानंतर शुभम राहत असलेल्या दुसर्‍या झोलो पी जी येथे घेऊन गेले. तेथे दोघांना पुढील ८ दिवस डांबुन ठेवले. त्यांच्या चेहर्‍यावरील व अंगावरील मारहाणीच्या जखमा बर्‍या झाल्यावर २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी शुभम हा त्या दोघांना घेऊन ओला कारने मुंबईला घेऊन गेला.

सिटी सेंटर मॉल येथील एका आयफोन स्टोअरमध्ये त्या दोघांना पाठविले. शुभम व त्याचा साथीदार हे बाहेर थांबले होते. फिर्यादी बरोबर ज्याला डांबुन ठेवले होते. तो फिर्यादी यांना स्टोअरमध्ये बसवुन फिर्यादीचा मोबाईल घेऊन तेथून काही एक न सांगता निघून गेला. बाहेर थांबलेला शुभम व त्याचा साथीदारही निघून गेला. त्यातील स्टोअर मॅनेजरने फिर्यादी यांना मित्राबाबत विचारल्यावर त्याने घडलेली हकीकत सांगून पोलिसांची मदत मागितली. तेव्हा तेथील मॅनेजरने फिर्यादी यांच्या वडिलांसोबत बोलणे करुन दिले. घरी जाण्यासाठी पैसे देऊन घरी पाठवुन दिले. २५ ऑक्टोंबर रोजी सकाळी फिर्यादी घरी पोहचले. तीन दिवसांनी त्यांच्या वडिलांना एका कॅब चालकाने फिर्यादीचा मोबाईल आणून दिला. आपले नग्न फोटो व्हायरल करतील, या भीतीमुळे व मारहाणीमुळे फिर्यादी खूप घाबरुन गेले होते. त्यामुळे त्यांनी आजवर तक्रार केली नव्हती. शेवटी धाडस करुन त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या मित्राच्या मैत्रिणीच्या प्रकरणावरुन हा सर्व प्रकार घडला आहे. तो मित्र यावा, म्हणून त्यांनी फिर्यादीसह दोघांना डांबून ठेवले होते. अंगावरील जखमा बर्‍या होईपर्यंत त्यांना डांबुन ठेवले होते. आरोपींचा शोध घेत आहोत.

You may have missed