Pune Crime News | विविध राज्यात 50 पेक्षा अधिक घरफोड्या करणार्‍या कुख्यात बांगलादेशी आरोपीला अलंकार पोलिसांनी केले जेरबंद; तरुणीच्या प्रेमातून धर्म बदलून गेला होता बांगला देशात (Video)  

Pune Crime News | Alankar police arrest notorious Bangladeshi accused who committed more than 50 house burglaries in various states; He had changed religion in Bangladesh due to love of a young woman (Video)

पुणे : Pune Crime News | तो मुळचा हिंदू, चांगला शेफ, हैदराबाद येथील एका सलुनमधील बांगला देशी तरुणीच्या प्रेमात पडला. त्यातून त्याने धर्मांतर करुन बांगला देशात गेला. पण, मुळची घरफोड्या करण्याची वृत्ती काही बदलली नाही. वेगवेगळ्या राज्यात घरफोड्या करणार्‍या या सराईत चोरट्याला अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने पकडले.

https://www.instagram.com/p/DWa14G0idge

मोहम्मद बशर नुर मोहम्मद (वय ३८, रा. साऊथ डोनिया, काडोमटोली, डोनिया, ढाका, बांगला देश ऊर्फ नेवानाथ विनोद कुमार (रा. व्यंकटपूर बालाजीनगर, रंगारेड्डी, तेलंगणा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कॅमेरा, लेन्स, एक ड्रोन, आयफोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तु असा ६ लाख रुपयांचा माल मिळून आला. तसेच त्याच्याजवळ बांगला देशी पासपोर्ट, अमेरिकन डॉलर, चायनीज मुद्रा, मलेशियन सिंगापूर, कॅनडियन, नेपाळ यांची करन्सी मिळून आली आहे.

कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटी येथील द टेरीटरी या कार्यालयाच्या खिडकीचा बार तोडून आतील सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, ड्रोन, आयफोन व इतर इलेक्ट्रोनिक्स वस्तू असा ६ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक जण रॉयल इन्फिल्ड कंपनीची हिमालय मॉडेल असलेली बुलेट घटनास्थळापासून चालवत घेऊन जाताना दिसला. या इन्फिल्डचा शोध घेतला असता तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर, लालबर्रा, शाडोल (मध्यप्रदेश), मिर्झापूर या मार्गे जात असल्याचे आढळून आले. अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. वाराणसी मधील रामनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामधील विविध पोलीस ठाण्यात ३६ गुन्हे दाखल आहेत.

मोहम्मद बशर नुर मोहम्मद असे तो नाव सांगत असला तरी नेवानाथ विनोद कुमार असे त्याचे नाव आहे. हैदराबाद येथील राहणारा असून तो बी टेकच्या दुसर्‍या वर्षाला होता. त्यावेळी त्याला चोरीच्या आरोपातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या घरच्यांनी जामीन न दिल्याने तो एक वर्षे तुरुंगात होता. त्यामुळे त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. एका सलुनमध्ये तो जात होता. तेथील बांगला देशी तरुणीच्या प्रेमात तो पडला. तरी त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही. त्यातून तो जवळपास अडीच वर्षे कारागृहात होता. कारागृहातून सुटल्यावर तो या तरुणीबरोबर नेपाळला गेला. तेथे बनावट कागदपत्रे बनवून तो बांगला देशात गेला. तेथे ९ वर्षे राहिला.

तो चांगला शेफ असल्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ढाका अशा ठिकाणी तो काम करत होता. सुमारे १ महिन्यांपूर्वी तो नेपाळ मार्गे उत्तर प्रदेशात आला. त्याने संतोष नावाच्या एका ओळखीच्या तरुणाच्या नावावर रॉयल इन्फिल्ड हिमालय मॉडेलची बुलेट खरेदी केली. त्यानंतर तो पुण्यात आला. त्याने कर्वेनगर येथे घरफोडी केली. ही घरफोडी केल्यानंतर तो तेलंगणामध्ये गेला. तेथून तो वाराणसीला गेला. बुलेटचा वापर करत असल्याने तो अलंकार पोलिसांच्या नजरेत आला आणि पकडला गेला.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले, पोलीस अंमलदार जगदीश् तळोले, निशिकांत सावंत, धीरज पवार, चांदगुडे, सोमेश्वर यादव, महिला पोलीस अंमलदार कुंभार यांनी केली आहे.

You may have missed