Pune Crime News | कारागृह पोलीस भरती दरम्यान धावताना तरुणाचा मृत्यु; शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील शनिवार सकाळची घटना
पुणे : Pune Crime News | कारागृह पोलीस भरती दरम्यान १६०० मीटर मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षाच्या तरुणाचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर शनिवारी सकाळी घडली.
पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. या मैदानी चाचणी संपल्यानंतर आता कारागृह पोलीस भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरु आहे़ शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम बारकुल हा मैदानी चाचणीत सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. पुरुषोत्तम याने मैदानाला तीन फेर्या पूर्ण केल्या. चौथ्थ्या फेरीसाठी तो धावत असताना त्याला अपस्माराचा झटका (फिट) आली. तो धावताना मैदानावरच कोसळला. त्याच्याबरोबर असलेल्या उमेदवारांच्या लक्षात हा प्रकार आला.
भरती प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या लक्षात हा प्रकार आला. मैदानावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे ससूनमधील डॉक्टरांनी सांगितले.
पुरुषोत्तम बारकुल हा पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून कारागृह पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. भरती प्रक्रियेसाठी त्याने तयारी केली होती. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाचा रहिवासी असलेल्या पुरुषोत्तम याचा भरती प्रक्रियेत धावताना मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली असल्याचे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.
