Pune Crime News | बापानेच मुलाला गोळ्या घालण्यासाठी सुपारी देण्याच्या गुन्ह्यातील पिस्तुल पुरविणारा 2 वर्षापासून फरार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून बापानेच मुलाला गोळ्या घालण्यासाठी ७५ लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणात शुटरांना पिस्तुल पुरविणारा सराईत गुन्हेगार गेली २ वर्षे फरारी होता. त्याला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
निलेश श्रीकांत गायकवाड Nilesh Shrikant Gaikwad (वय २४, रा. शर्लिन अव्हेन्यु अपार्टमेंट, पिसोळी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. कोहिनूर इस्टेट सोसायटी, खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना जंगली महाराज रोडवरील अरगडे हाईटस येथे १६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. पिस्तुलातून गोळी न उडल्याने धीरज अरगडे हे वाचले होते. धीरज अरगडे यांचे डी एस अरगडे प्रमोटर अँड बिल्डर्स या नावाने अरगडे हाईटस येथे कार्यालय आहे. ते १६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता जंगली महाराज रोडवरील कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या चार चाकी गाडीत बसले. गाडी उन्हात असल्याने त्यांनी एसी सुरु करुन काच खाली केली होती. त्याचवेळी दुचाकीवर दोघे जण आले. मागे बसलेल्याने त्यांच्याकडील पिस्तुल काढून त्यांच्यावर रोखून फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गोळी उडाली नाही़ हे पाहून धीरज अरगडे यांनी घाबरुन आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते तू आता वाचला रे, आता वाचला, असे बोलून ते पळून गेले होते.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. या तपासात धीरज अरगडे यांच्यावर चतु:श्रृंगी परिसरातही यापूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. धीरज अरगडे हे तेव्हा एकटे रहात होते. त्यांचा घटस्फोट झाला होता. गुन्हे शाखेने तपास करुन याप्रकरणी ६ जणांना अटक केली होती. त्यात धीरज अरगडे यांच्या वडिलांनीच कौटुंबिक कारणावरुन मुलाला मारण्यासाठी दोघांनां ७५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी २० लाख रुपये देण्यात आले होते. सुपारी घेतलेल्यांनी शुटरांना ५ लाख रुपये दिले होते. या प्रकरणात गुन्हे शाखेने १० आरोपी निष्पन्न केले होते. शुटरांना सुपारी पुरविणारा निलेश गायकवाड हा तेव्हापासून फरार होता.
खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे ३० मार्च रोजी काळेपडळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमी मिळाली की, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का गुन्ह्यातील आरोपी निलेश गायकवाड हा त्याच्या आईला भेटण्यासाठी ती सध्या राहत असलेल्या पिसोळीतील शर्लिन अव्हेन्यू अपार्टमेंट येथे येणार आहे. या बातमीची खात्री करुन पोलिसांनी परिसरात सापळा रचला. निलेश गायकवाड तेथे येताच त्याला पकडले. चौकशी केल्यावर गुन्ह्यातील सहभागाची त्याने कबुली दिली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, साहील शेख यांनी केली आहे.
