Pune Crime News | अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून ड्रग्ज रॅकेटचा उलघडा; 300 जणांना ड्रग्ज विकल्याचे आले समोर, उत्तमनगर पोलिसांनी चौघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गेले ८ महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला उत्तमनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे ३ ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) व दोन मोबाईल मिळाले. मोबाईलमधील व्यवहारावरुन या गुन्हेगाराने तब्बल २५० ते ३०० जणांना अंमली पदार्थ विकले असून त्यातून त्याच्याकडे १० लाख रुपये आल्याचे दिसून आले. त्यातून अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.
सुनील गोपाळ राठोड Sunil Gopal Rathod (वय २८), राजन गोपाल नायर Rajan Gopal Nair (वय ३७, रा. उत्तमनगर), जतीन जयंवत कदम Jatin Jaywant Kadam (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते Shubham Santosh Dahibate (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उत्तमनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२५ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी मुलीची सुटका केली. परंतु, तेव्हापासून सुनील राठोड हा फरार होता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर यांना सुनील राठोड हा सिंहगड सृष्टी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सापळा लावून सुनील राठोड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) व दोन मोबाईल मिळाले.
पोलीस ठाण्यात आणून मोबाईलची तपासणी केली. त्यात राठोडच्या मोबाईलवर जवळपास १० लाखांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्याने २५० ते ३०० जणांकडून त्याच्या खात्यात पैसे आल्याचे दिसत होते. तर ६ ते ८ जणांना साडेपाच लाख रुपये दिल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केल्यावर त्याने जवळपास ३०० जणांना मेफेड्रोन विक्री केल्याचे सांगितले. तो १ ग्रॅम एम डी अडीच ते तीन हजार रुपयांना विकत असल्याचे सांगितले. ज्यांच्याकडून हे अंमली पदार्थ मिळत त्यांना पैसे दिल्याचे सांगितले. त्यातून ८ जणांची नावे समोर आली आहे.
सुनिल राठोड हा संघटितपणे अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे दिसून आले. उत्तमनगर पोलिसांनी शुभम दहिभाते याला अटक केली. गुन्हे शाखेने राजन नायर आणि जतीन कदम यांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या आरोपींकडून ८ ग्रॅम एम डी सह मोबाईल व वाहने असा २ लाख ३६ हजार रुपयांचा माल हस्तगत केले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, अक्षय पाटील, मुकेश कुरेवाड, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, पोलीस अंमलदार चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुद्ध गायकवाड यांनी केली आहे.
