Sandeep Khardekar | अनधिकृत केबल जाळ्यांवर कारवाईचे स्वागत; मात्र, वाहिन्या भूमिगत करण्यासाठी धोरण ठरवावे – संदीप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Sandeep Khardekar | महापालिकेने शहरातील हवेतील अनधिकृत केबल जाळ्यांवर कारवाई सुरू केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्त नवलकिशोर राम आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांना पत्र देत ही कारवाई योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
खर्डेकर यांनी यापूर्वीही अनेकदा हा विषय प्रशासनासमोर मांडला होता. त्यांच्या मते, अनधिकृत वायरच्या जाळ्यामुळे शहराची स्कायलाईन बिघडत असून, इंटरनेट आणि केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या शहरातील सार्वजनिक जागेचा मोफत वापर करून मोठा आर्थिक फायदा मिळवत आहेत.
त्यांनी हवाई वाहिन्या भूमिगत करण्यासाठी सक्तीचे धोरण लागू करण्याचीही मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणी देखील महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्ते खोदाई शुल्क जास्त असणे, परवानगी प्रक्रियेत होणारा त्रास, तसेच प्रत्यक्ष कामादरम्यान खंडणीखोरांकडून होणारा त्रास यामुळे अनेक कंपन्या नियमित पद्धतीने काम करण्यास पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाकडून आकारण्यात येणारे खोदाई शुल्क हे रस्ते पूर्ववत करण्यासाठी घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात रस्ते पूर्वस्थितीत आणले जात नसल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यामुळे याबाबत स्पष्ट आणि काटेकोर धोरण ठरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या शहरात सीसीटीव्ही बसविणे आणि महावितरणच्या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान डक्ट तयार करण्यात आले असतील, तर भविष्यात हवाई केबल्स भूमिगत करताना त्यांचा वापर करावा आणि त्यासाठी भुईभाडे आकारावे, अशी सूचनाही खर्डेकर यांनी केली. यामुळे नव्याने रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तातडीने निर्णय घेऊन शहरातील अनधिकृत केबल जाळे आणि भूमिगत वाहिन्यांबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
