Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला पकडून नर्हे पोलिसांनी एक पिस्टल व एक काडतुस केले जप्त; बीडमधील गावातील वादातून खबरदारी म्हणून बाळगले
पुणे : Pune Crime News | अवैध धंद्यावर कारवाई करत असताना मिळालेल्या माहितीवरुन नर्हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल व एक काडतुस जप्त केले आहे.
अमोल पदमाकर सोळुंके Amol Padmakar Solunke (वय २४, रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी, सध्या रा. पार्वती हाईटस, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या मागे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल सोळुंके हा मुळचा बीड जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यापूर्वी २०२१ व २०२२ मध्ये दंगल माजवून मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यातील गावाकडील वादातून सुरक्षेसाठी त्याने एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून हे पिस्टल घेतल्याचे सांगत आहे.
नर्हे पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व शाहु राठोड यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मानस ग्राऊंड येथे एक जण संशयितरित्या फिरत असून त्याच्याकडे पिस्टल आहे. बातमीची खातरजमा केल्यानंतर तेथे एक जण दिसून आला. पोलिसांनी त्याला जागीच पकडले. अमोल सोळुंके याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. नर्हे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार संजय शिदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, शाहु राठोड, कांतीलाल धोत्रे यांनी केली आहे.
