Sunny Vinayak Nimhan | औंध-बोपोडीकरांसाठी मोठा दिलासा : संजय गांधी रुग्णालय होणार मल्टीस्पेशालिटी, लवकरच उद्घाटन – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची ग्वाही

Sunny Vinayak Nimhan | Big relief for Aundh-Bopodikars: Sanjay Gandhi Hospital to be multispecialty, inaugurated soon - Standing Committee Chairman Srinath Bhimale assures

नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : Sunny Vinayak Nimhan | औंध-बोपोडी प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. औंध-बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय लवकरच अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असून त्याचे उद्घाटनही लवकरात लवकर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे.

नगरसेवक सनी निम्हण यांनी या संदर्भात पाठपुरावा करत सविस्तर निवेदन सादर केले होते. त्या मागणीची दखल घेत अध्यक्ष भिमाले यांनी सकारात्मक भूमिका घेत, संबंधित रुग्णालयाचा मल्टीस्पेशालिटी योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी विशेषत्वाने स्पष्ट केले की, हे रुग्णालय पीपीपी (Public-Private Partnership) मॉडेलवर देण्यात येणार नाही. रुग्णालय पूर्णतः पुणे महानगरपालिकेद्वारेच चालवले व व्यवस्थापित केले जाईल.

ही भूमिका नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

औंध, बोपोडी तसेच पिंपरी-चिंचवड सीमेलगतच्या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे त्वरित कार्यान्वित होणे व मल्टीस्पेशालिटीमध्ये रूपांतर होणे अत्यंत गरजेचे होते. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना खालील सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत :

  • अत्याधुनिक ट्रॉमा केअर व आपत्कालीन सेवा
  • आयसीयू व एनआयसीयू सुविधा
  • माता व बाल आरोग्य सेवा
  • विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार

नगरसेवक सनी निम्हण यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की,
“औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. स्थायी समिती अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

या निर्णयामुळे औंध-बोपोडी व आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.

You may have missed