Pune Crime News | बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने पकडला 34 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा
पुणे : Pune Crime News | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला पकडून त्याच्याकडून तब्बल ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.
सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या आय एक्स २४१ या विमानाने बँकॉकहून एक प्रवासी आला होता. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकार्यांना या प्रवाशाचा संशय आला. तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या हँडबॅगमध्ये दोन पारदर्शक व्हॅक्युम सीलबंद पॅकेटस आढळून आले. या पॅकेटमध्ये आतून कार्बन पेपर मध्ये गुंडाळून आत चतुराईने हायड्रोपोनिक गांजा गुंडाळून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. हा ९६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ३३ लाख ६० हजार रुपये आहे. या प्रवाशाला अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्यामागील आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रॅकेटचा शोध घेण्यात येत आहे.
